भारतात पर्यटनासाठी आलेल्या परदेशी महिला पर्यटकांनी स्कर्ट घालून फिरू नये असा अजब सल्ला केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी दिला आहे. त्यांच्या या अजब सल्ल्यामुळे त्यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. भारतात येणा-या विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत असा सवाल त्यांना एका पत्रकार परिषदेत विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हा सल्ला दिला. परदेशी पर्यटक जेव्हा विमानतळावर येतात तेव्हा त्यांना विमानतळावर एक वेलकम किट दिले जाते . या किटमध्ये त्यांना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ यासंबधीच्या सुचना देण्यात आल्या आहेत असेही त्यांनी रविवारी आग्रा येथे सांगितले. या सूचनांनमध्ये छोट्या गावांत किंवा शहरांच्या ठिकाणी तोकडे कपडे किंवा स्कर्ट घालून फिरू नये अशा प्रकारच्या सूचना परदेशी महिलांना करण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे सल्ले ऐकून अनेकांनी त्यांच्यावर टीका करून त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
रात्रीच्यावेळी पर्यटकांनी बाहेर भटकू नये, पर्यटनासाठी ते ज्या गाडीचा वापर करतील त्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो आपल्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईंकांना पाठवणे अशाही सुरक्षतेच्या सुचना यात करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण स्त्रियांच्या कपड्यांबाबत शर्मा यांनी दिलेल्या सूचना अनेकांना रुचल्या नाहित, परंतु आपण कपड्यांबाबत अशी टिप्पणी केली नसल्याचे सांगत शर्मा यांनी लोकांचा रोष शांत करण्याचा प्रयत्न केला.