ट्रम्पकाल सुरू!.. ‘प्रथम अमेरिका’चा नारा; स्वदेशी वस्तूंची खरेदी, देशी हातांनाच काम देण्याची हाक; अतिरेकी इस्लामी दहशतवादाचे समूळ उचाटन करण्याचा निर्धार

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल हिल परिसरात शुक्रवारी महासत्तेच्या दिमाखाला साजेशा कार्यक्रमात सत्तेची सूत्रे हाती घेताना नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला स्वदेशीचा मंत्र दिला. ‘अगदी आज, आतापासून अमेरिकेची विपन्नावस्था संपणार आहे. अमेरिकी हातांनी आणि अमेरिकी श्रमांनीच आता आपण अमेरिकेची पुनर्बाधणी करणार आहेत. अमेरिकी हातांनाच काम देणार आहोत आणि अमेरिकी उत्पादनेच विकत घेणार आहोत’, अशी भावनिक साद घालत ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीची सुरुवात केली. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी इस्लामी कट्टरतावादाचा समूळ नाश करण्याची घोषणाही केली. मात्र तो मुद्द ओझरता आला. त्यावर अधिक भाष्य करण्याचे ट्रम्प यांनी टाळले.

वॉशिंग्टनमधील सेंट जॉन्स चर्चमध्ये शुक्रवारी सकाळी प्रार्थना करून डोनाल्ड आणि मेलनिया हे ट्रम्प दाम्पत्य व्हाइट हाऊसकडे रवाना झाले. मावळे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचे सपत्नीक स्वागत केले. तेथून ट्रम्प यांच्या वाहनांचा ताफा कॅपिटॉल हिल परिसरात होणाऱ्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निघाला. निळ्या वेशातील नव्या ‘फर्स्ट लेडी’ मेलनिया आणि पांढरा सदरा, लालभडक टाय आणि निळा सूट परिधान केलेले नवे अध्यक्ष ट्रम्प कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वी उपाध्यक्ष माइक पेन्स सपत्नीक हजर होते. त्यासह ओबामा दाम्पत्य आणि अन्य अधिकाऱ्यांनीही आपापले स्थान ग्रहण केले होते. सुमारे दहा लाखांचा जनसमुदाय या शपथग्रहण सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी कॅपिटॉल हिल परिसरात उपस्थित होता. प्रथम उपाध्यक्ष पेन्स यांना आणि नंतर ट्रम्प यांना सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडून शपथ देण्यात आली. उजवा हात उंचावून दोघांनीही घटनेशी प्रामाणिक राहून अमेरिकेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेतली.

त्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी देशवासीयांना संबोधित केले. ‘आज येथे केवळ एका अध्यक्षांकडून दुसऱ्या अध्यक्षांकडे, एका सरकारकडून दुसऱ्या सरकारकडे सत्तेचे हस्तांतरण होत नसून वॉशिंग्टन डीसीकडून अमेरिकी नागरिकांच्या हाती सत्तेचे हस्तांतरण होत आहे’, अशा शब्दांत अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेच्या भावनांना साद घातली. आजवर केवळ अमेरिकी सरकारे आणि सरकारी अधिकारी गलेलठ्ठ बनले. त्यांनी केवळ आपल्याच तुंबडय़ा भरल्या. यापूर्वीच्या सरकारांचा विजय हा आपल्या नागरिकांचा विजय नव्हता. मात्र हा क्षण तुमचा आहे. हा तुमचा दिवस आहे. हा तुमचा आनंदोत्सव आहे. कोणता पक्ष सरकारवर नियंत्रण करतो हे महत्त्वाचे नाही तर देशाचे नागरिक त्याचे नियंत्रण करतात की नाही हे महत्त्वाचे आहे. आजच्या दिवशी सत्ता पुन्हा लोकांच्या हाती जात आहे, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प पुढे म्हणाले, आम्ही अन्य देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करू. आपली संस्कृती कोणावर लादणार नाही. पण अमेरिकेचे भले साधू. देशभक्ती व्यक्त करत असताना कोणाविरुद्ध पूर्वग्रहाला थारा नसेल. मतभेदांवर चर्चा करू पण एकता सोडणार नाही.

देशाच्या शहरी किंवा ग्रामीण भागात जन्मलेल्या बालकाच्या रोमरोमांत विधात्याचा एकच श्वास असेल. सर्वाच्या रक्ताचा वर्ण लालच असेल.  आपल्या मनांत भीती असता कामा नये. आपण आपले संरक्षण करू, आपली सेनादले आपले संरक्षण करतील आणि आपला देव आपले संरक्षण करेल. एकत्रपणे आपण अमेरिकेला पुन्हा बलशाली, सुरक्षित, संपन्न आणि महान बनवू असे ट्रम्प म्हणाले.

  • शपथविधी सोहळ्याच्या या क्षणाच्या मुळाशी एकच श्रद्धा आहे, ती म्हणजे लोकांसाठी सत्ता राबवणे
  • आजवर आपण आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून अन्य देशांच्या सीमांचे रक्षण केले
  • अमेरिकेची संपत्ती अन्य देशांच्या घशात गेली. कारखाने बंद होत गेले. नागरिकांच्या नोकऱ्या जात होत्या. मात्र तो भूतकाळ आहे. आता फक्त भविष्याकडे पाहायचे आहे
  • बंद कारखाने, बिघडलेली शिक्षणव्यवस्था अशा अमेरिकेच्या अडचणी आता संपणार आहेत. आजपासून नवी दृष्टी आपल्या शासनाला प्रेरणा देईल
  • प्रत्येक निर्णय अमेरिकेच्या भल्यासाठी असेल. आम्ही आमच्या नोकऱ्या, आमची सुरक्षा, आपली स्वप्ने पुन्हा खेचून आणू. आपल्या संरक्षणावर भर देऊ. या संरक्षणातून सुबत्ता येईल
  • मी कधीही तुम्हाला पराभूत होऊ देणार नाही. नवे रस्ते, नवे पूल, नवे रेल्वेमार्ग अशा नव्या पायाभूत सुविधांची उभारणी करू
  • केवळ बोलघेवडय़ा राजकारण्यांची सद्दी आता संपेल. आता प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनाच जागा असेल

ट्रम्प यांच्या विरोधात जोरदार निदर्शने

वॉशिंग्टन : शुक्रवारी अमेरिकेत झालेल्या नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्ताग्रहण समारंभाला विविध ठिकाणी पार पडलेल्या विरोधी निदर्शनांची गडद किनार होती. ट्रम्प यांच्या कथित द्वेषमूलक आणि विभाजनवादी धोरणांचा अनेक स्तरांतून विरोध करण्यात आला.

  • नॅशनल प्रेस क्लबबाहेर जमलेल्या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना मिरीपूड फवारावी लागली. निदर्शकांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवा, अशा घोषणा दिल्या. कॅपिटोल हिल परिसरातही अनेकांनी निदर्शने केली. गोऱ्या लोकांची अधिकारशाही निर्माण करणारे हे फॅसिस्ट आहेत, अशा आशयाचे फलक झळकावण्यात आले.
  • प्यू रिसर्च सेंटरने घेतलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात ८६ टक्के नागरिकांनी देश कट्टरतावादाच्या मुद्दय़ावर दुभंगला असल्याचे मत नोंदवले आहे.
  • भारतीय-अमेरिकी प्रतिनिधी प्रमिला जयपाल यांच्यासह अनेक प्रतिनिधींनी ट्रम्प यांच्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला होता.
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी प्रशासनातील महत्त्वाच्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांच्या नावावर काँग्रेसतर्फे शिक्कामोर्तब करण्यास उशीर लावत असल्याबद्दल ट्रम्प यांच्या ‘ट्रान्झिशन टीम’ने अमेरिकी सिनेटमधील डेमॉक्रॅटिक पक्षावर टीका केली. भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकप्रतिनिधी निक्की हॅले यांच्यासह इतर मंत्र्यांना दोन्ही बाजूंचा पाठिंबा असून ते ‘सहमतीचे उमेदवार’ मानले जात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले
  • ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील काही महत्त्वाच्या सदस्यांच्या नावांवर सिनेट सोमवापर्यंत शिक्कामोर्तब करेल अशी आशा व्हाईट हाऊसचे नवे माध्यम सचिव (प्रेस सेक्रेटरी) सीन स्पायसर यांनी व्यक्त केली.
  • शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सिनेटर मॅकनेल हे काम करत आहेत. मात्र इतर डेमॉक्रॅट्सनी त्यांना साथ द्यायला हवी. परंतु त्यांनी त्यांची तथाकथित ‘हिट लिस्ट’ जाहीर केली. यात उल्लेख केलेल्या आणि त्यांच्या राजकीय ‘हिट लिस्ट’वर नसलेल्या सचिव चाओ, डॉ. बेन कार्सन व गव्हर्नर निक्की हॅले यांचा समावेश होता. प्रत्यक्षात हे सहमतीचे उमेदवार आहेत, यावर स्पायसर यांनी भर दिला.

ओबामा यांच्याकडून पत्रात देशवासीयांचे आभार

वॉशिंग्टन : देशवासीयांना उद्देशून लिहिलेल्या अखेरच्या पत्रात मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्याला अधिक चांगला अध्यक्ष आणि चांगली व्यक्ती बनण्यासाठी दिलेल्या आधारासाठी आभार व्यक्त केले. तसेच प्रत्येक टप्प्यावर मी तुमच्यासोबत राहीन, असे आश्वासनही दिले.

गेल्या आठ वर्षांत तुम्ही माझ्या चांगुलपणाचे, आशावादाचे आणि पुन्हा उभारी घेऊन कामाला लागण्याचे प्रेरणास्रोत होता. आपल्या देशापुढील सर्वात कठीण काळात मी शेजारी एकमेकांना आधार देताना पाहिले आहेत. दु:खाच्या प्रसंगी नागरिकांच्या शोकात मी सहभागी झालो आहे. मी तुमच्याकडून बरेच काही शिकलो आहे. नवे पदवीधर आणि सैन्यातील नवे उमेदवार यांच्याकडून मी उत्साह घेतला आहे. लहान मुलांकडून मी निर्वासितांशी चांगले वागण्याचे धडे घेतले आहेत. अमेरिकी नागरिकांच्या खळाळत्या उत्साहाचा, धीरोदात्त भूमिकेचा, विनोदबुद्धीचा, नम्रतेचा आणि संवेदनशीलतेचा मी साक्षीदार राहिलो आहे.  या सर्व गोष्टींबद्दल मी तुमचा आभारी आहे.

भारतीय वंशाच्या कलाकारांची उपस्थिती

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्ताग्रहणानिमित्त झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक मूळ भारतीय वंशाच्या कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यात अग्रेसर होते डीजे (डिस्क जॉकी) आणि ड्रमर रवी जखोटिया. त्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

एका टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या ऑनलाइन मुलाखतीत जखोटिया यांनी म्हटले की, कार्यक्रमात वैविध्य आणण्याची संधी मिळत असल्याने मी हे निमंत्रण स्वीकारले. माझे वडील केवळ ८ डॉलर घेऊन अमेरिकेत आले होते. त्यांनी मला  परिश्रम करण्यास शिकवले. त्याशिवाय बॉलीवूड कलाकार मनस्वी ममगाई हिच्या पथकाने गाणी व नृत्य सादर केले. त्यात ए. आर. रेहमान यांच्या ‘जय हो’, ‘जुम्मे की रात है’ अशा गाण्यांचा समावेश होता.

रशियात आनंदोत्सव

मॉस्को: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त रशियामध्ये हर्षोल्हासाचे वातावरण होते. अमेरिका आणि रशिया हे पारंपरिक शत्रू मानले जात असले तरी ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना धार्जिण्या धोरणाचे संकेत दिल्याने दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याची आशा केली जात आहे. याच आशेवर रशियात उत्साहाचे वातावरण दिसून आले.  रशियाने युक्रेन आणि सीरियात केलेला हस्तक्षेप तसेच अमेरिकी निवडणूक प्रक्रियेत केलेले हॅकिंग यांच्या पाश्र्वभूमीवर सध्या दोन्ही देशांत तणाव होता.  मात्र ट्रम्प यांनी रशियाशी सहकार्याचे संकेत दिले. त्या पाश्र्वभूमीवर रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले की, ट्रम्प यांचे रशियाबाबतचे धोरण अद्याप सुस्पष्ट नाही, मात्र त्यांची भूमिका रास्त असेल अशी अपेक्षा आहे. हॉटेल, रेस्तराँ आणि बारमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.