राजस्थानमधील माऊंट अबूमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कारवरील ताबा सुटलेल्या एका चालकाने दुचाकीवरील एका दाम्पत्याला धडक दिली. धडक दिल्यामुळे दुचाकी कारसमोर आली. मात्र मद्यधुंद चालकाने ब्रेक न लावता या दाम्पत्याला दुचाकीसह फरफटत नेले. कार चालकाने ५० फूट फरफटत नेल्यानंतर स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दाम्पत्याचे प्राण वाचले.

माऊंट अबूमधील एका रस्त्यावर इको कार चालवत असलेल्या मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर या कारने अनेक वाहनांना धडक दिली. मात्र तरीही कार चालकाने ब्रेक दाबला नाही. यानंतर इको कारसमोर एक दुचाकी आली. या दुचाकीवर एक दाम्पत्य होते. कारने धडक दिल्यामुळे दुचाकी आडवी झाली. मात्र कार चालकाने ब्रेक न दाबल्यामुळे दुचाकीसह दाम्पत्यदेखील फरफटत गेले. मद्यधुंद चालकाने जवळपास ५० फूट अंतर या दाम्पत्याला फरफटत नेले.

रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोकांनी हा धक्कादायक प्रकार पाहिला. यावेळी रस्त्याशेजारी असलेल्या दुकानातील एका तरुणाने प्रसंगावधान दाखवले. या तरुणाने कारच्या दिशेने धाव घेतली आणि धावत्या कारचा दरवाजा उघडत चालकाला ब्रेक दाबण्यास भाग पाडले. तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कार थांबली. यानंतर दुचाकीवरील दाम्पत्याची उपस्थितांनी सुटका केली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. कारने दिलेल्या धडकेत एकूण सहाजण जखमी झाले आहेत.

कारने दिलेली धडक आणि त्यामुळे तब्बल ५० फूटांपर्यंत फरफटत गेलेले दाम्पत्य, हा संपूर्ण थरार रस्त्याशेजारी असणाऱ्या दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कार चालकाचे नाव वसीम खान असून घटनास्थळी असलेल्या जमावाने चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.