पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर पत्रकांमधून टीका केल्यानंतर मद्रास आयआयटी परिसरातील आंबेडकर – पेरियार स्टुडन्ट सर्कल या अनुसूचित जाती-जमातीच्या विचार मंचावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आज डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मद्रास आयआयटी परिसरात रास्ता रोको केले. त्यात शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. दरम्यान मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मद्रास आयआयटीने केलेली कारवाई मार्गदर्शक तत्त्वानुसार केली असल्याचे सांगून समर्थन केले आहे. गोहत्या बंदी व हिंदी भाषेबाबत मोदी सरकारच्या धोरणांवर विचारमंचने काढलेल्या पत्रकात टीका करण्यात आली होती.
आंदोलनकारी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार व स्मृती इराणी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली. रा.स्व.संघाचा कार्यक्रम तामिळनाडूत चालू देणार नाही असे एका कार्यकर्त्यांने सांगितले. आणखी निदर्शनांची शक्यता असल्याने आयआयटी-एम या संस्थेची सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान मद्रास आयआयटीने विचार मंचावर घातलेल्या बंदीमुळे धक्का बसल्याची प्रतिक्रिया द्रमुक व एमडीएमके या पक्षांनी व्यक्त केली आहे. द्रमुकचे विश्वस्त एम.के.स्टालिन यांनी सांगितले की, केंद्र सरकारचा शैक्षणिक संस्थांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप वाढत आहे. आताच्या निर्णयामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली आहे.