शास्त्रज्ञांचा इशारा
सूर्याकडून फेकल्या जाणाऱ्या उच्च ऊर्जा लहरींमुळे पुथ्वीवर लवकरच सौरवादळ धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे सर्व उपग्रह यंत्रणा कोलमडण्याची शक्यता असून विद्युत पुरवठय़ावरही याचा मोठा परिणाम होईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
 या उच्च ऊर्जा लहरींचा वेग १६ लाख ९ हजार ३४४ किलोमीटर प्रति तास इतका आहे. यातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे या वादळाची पूर्वसूचना केवळ ३० मिनिटे आधीच समजते, अशी माहिती ‘द इंडिपेंडंट’ या वृत्तपत्राने दिली आहे. हे सौर वादळ दर १०० किंवा २०० वर्षांनी पृथ्वीवर धडकते. यापूर्वी १८५९ साली या वादळाचा फटका बसला होता.  
त्या वेळी अंतराळामध्ये कोणतेही उपग्रह अथवा दळणवळणाची साधने नव्हती, त्यामुळे ‘त्या’ वादळाचा फारसा परिणाम जाणवला नाही. यंदा मात्र अंतराळात अनेक उपग्रह व प्रयोगशाळा कार्यरत असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी अनेकदा हे सौर वादळ पृथ्वीच्या जवळून गेले होते. १९८९ साली आलेल्या सौम्य वादळाचा फटका कॅनडातील विद्युत सयंत्रणेला बसला होता, त्यामुळे कॅनडातील अनेक भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. या वादळाची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारने योग्य यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे मत या विषयांतील संशोधक प्रा. पॉल कॅनन यांनी व्यक्त केले.
सौर वादळ हे पृथ्वीवर कधीतरी धडकणार ही वस्तुस्थिती आहे. या वादळाला न घाबरता त्याचा खंबीरपणे मुकाबला करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने या वादळामुळे होणारे नुकसान कमी करता येऊ शकते, असा दिलासाही त्यांनी या वेळी दिला.