माता सुभद्रेच्या गर्भात असतानाच अभिमन्यू चक्रव्यूहात शिरण्याची कला शिकला होता! अर्जुनाने आपल्या पत्नीला चक्रव्यूहात कसे शिरायचे, हे विस्ताराने सांगितले तेव्हा गर्भातला अभिमन्यू ते ऐकत होता. नंतर सुभद्रेला झोप लागल्याने त्या चक्रव्यूहाचा भेद करून बाहेर कसे पडायचे, हा भाग त्याने ऐकला नव्हता, असे महाभारताची कथा सांगते. भारतात म्हणूनच प्राचीन काळापासून गर्भसंस्कारांचे महत्त्व बरेच आहे. गर्भवती मातेच्या कानी चांगले विचार पडावेत, तिने चांगले विचार वाचावेत, अशी सर्वसाधारण मान्यताही आहे. या गर्भसंस्कारामागील विचाराला पुष्टी देणारे संशोधन नुकतेच झाले असून गर्भातले अर्भक सहाव्या महिन्यापासूनच शब्दध्वनी ऐकू शकते आणि त्यातला फरकही ओळखू शकते, हे आता सिद्ध होत आहे.
डॉ. फॅब्रिक व्ॉलोइज यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंच संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार २८ आठवडय़ांच्या गर्भालाही ‘गा’ आणि ‘बा’ यातला फरक समजतो तसेच पुरुषाचा आवाज आणि स्त्रीचा आवाज यांच्यातला फरकही त्यांना ओळखता येतो. मुदतीआधीच जन्मलेल्या १२ अर्भकांच्या मेंदूपरीक्षेनुसार त्यांनी हे शोध लावले आहेत.
गर्भ २३ आठवडय़ांचा झाल्यावर कानाचा अवयव आणि ध्वनी ऐकण्याचे मेंदूतील तंतू आकारत असतात. त्यामुळे गर्भावस्थेतल्या मुलाला स्वरज्ञान होते, असे आधीच सिद्ध झाले आहे. मात्र त्या ज्ञानाच्या आधारावर मूल बोलायला शिकते की जन्मानंतर त्याला बोलायला शिकवले जाते त्यातून ते बोलायला शिकते, यावर मात्र दुमत आहे. डॉ. व्ॉलोइज यांच्या मते, बाह्य़ वातावरणाचे संस्कारही महत्त्वाचे असतात पण भाषाशिक्षणाची प्रक्रिया ही जन्मसिद्धच असते. जन्मानंतर अनुभवाने, सहवासाने आणि संस्काराने भाषा आकलन आणि अभिव्यक्तीत मूल पारंगत होते पण त्याची सुरुवात गर्भावस्थेतच झाली असते, असा या संशोधकांचा दावा आहे.