पाकिस्तानमध्ये पहाटेच्या सुमारास ४ स्टार हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत ११ जण ठार, तर ७५ जण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींमध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. घटनेच्या वेळी पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा क्रिकेटपटू शोएब मकसूद हॉटेलमध्ये होता. तो घटनेतून सुखरुप बचावला तर, प्रथम श्रेणी क्रिकेटपटू यासीन मुर्तझा आणि करामत अली हे दोघे जखमी झाले आहे. मकसूदने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.

मृतांमध्ये चार महिलांचा आणि जखमींमध्ये विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात असणाऱ्या शाहराह-इ-फैसल या ठिकाणी असलेल्या रिजेंट प्लाजाच्या स्वयंपाक घराला आग लागली आणि पाहता-पाहता ही आग पूर्ण सहा मजली हॉटेलमध्ये पसरली. या हॉटेलमध्ये १०० जण असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आग लागल्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. बरेच जण इमारतीमध्ये अडकले. काही जण होरपळले तर काहींचा धुराने श्वास कोंडून मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काही लोकांनी हॉटेलच्या खिडकीमधून उड्या मारल्या त्यामुळे ते देखील जखमी झाले. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आगीची माहिती मिळताच तीन अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी त्वरीत बचावकार्य सुरू केले. एमरजेंसी एक्जिट ब्लॉक झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता.
कराचीचे महापौर वसीम अख्तर हे देखील घटनास्थळी दाखल झाले. या आगीचे कारण अद्याप समजले नसल्याचे त्यांनी म्हटले.

या आगीत भाजलेल्या आणि जखमी झालेल्या ६५ जणांना अतिदक्षता विभागात नेण्यात आले आल्याची माहिती डॉ. सीमिन जमाली यांनी पत्रकारांनी दिली. खिडकीमधून उड्या मारल्यामुळे काही जणांची हाडे तुटली आहेत तर काही जण काचांवर पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले असल्याचे जमालींनी सांगितले.
आग आटोक्यात आली असली तरी अद्याप बचावकार्य सुरू असल्याचे महापौर अख्तर यांनी सांगितले आहे.