संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी कमी होत असल्याबद्दल आणि कामकाजात सातत्याने व्यत्यय आणण्यात येत असल्याबद्दल उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या गटाच्या अथवा व्यक्तीच्या हितासाठी सभागृहाला वेठीस धरणे योग्य नाही, असेही अन्सारी यांनी म्हटले आहे.

सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेण्यासारखे प्रकार म्हणजे मौल्यवान वेळेचा अपव्यय आहे आणि ते अन्य सदस्यांच्या हक्कांवर अतिक्रमण करण्यासारखे आहे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले. राज्यसभेवर नव्याने निवडून आलेल्या आणि नियुक्त केलेल्या सदस्यांसाठी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हे आपले व्यक्तिगत मत असून आपल्या कारकिर्दीत जे पंतप्रधान झाले त्यांच्याशी या बाबत आपण चर्चा केली आहे. यापूर्वी संसदेचे कामकाज १०० ते ११० दिवस चालत होते, चर्चेसाठी, वादासाठी वेळ पुरेसा होता, मात्र आता सरासरी ७० दिवस कमीअधिक प्रमाणात कामकाज चालते, त्यामुळे कालव्यवस्थापनाची नितांत गरज आहे, असेही अन्सारी म्हणाले.

एखादी गोष्ट न पटल्यास अल्पकाळासाठी सभात्याग करणे समजण्यासारखे आहे, मात्र सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेण्यासारख्या प्रकारांमुळे सदस्यांबद्दल जनतेमध्ये वाईट ठसा उमटतो, एखादी गोष्ट संसदीय पद्धतीने निदर्शनास आणून दिली पाहिजे. संसदीय आणि असंसदीय परिघाच्या बाहेर आल्यास सर्वसामान्य जनताही त्याचे अनुकरण करील, मोकळ्या जागेत धाव घेणे म्हणजे सभागृहाला वेठीस धरण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.