आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार; ६ महिने राजस्थानात राहणार
पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याची नऊ महिन्यांच्या कारावासानंतर येथील लाजपूर तुरुंगातून सुटका झाली. यावेळी हे आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, मला ‘५६ इंचांची छाती’ नको असून माझ्या समुदायाचे अधिकार हवे आहेत, असा टोला त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारला.
पाटीदार समुदायाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण मिळावे या मागणीसाठीचे आंदोलन आपण सुरूच ठेवणार असल्याचे जामीन मिळून तुरुंगाबाहेर आलेल्या हार्दिक (२२) याने सांगितले. पाटीदार समाज ज्यांना आपलेच भाईबंद असल्याचे मानतो, त्या कुर्मी समुदायाला सहभागी करून हा लढा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे संकेतही त्याने दिले.
हार्दिकविरुद्धचे देशद्रोहाचे दोन गुन्हे आणि पाटीदार आंदोलनादरम्यान विसानगर येथील आमदाराच्या कार्यालयातील हिंसाचाराचे एक प्रकरण यामध्ये हार्दिकला जामीन मंजूर करून गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता.
येत्या सहा महिन्यांसाठी हार्दिकने गुजरातबाहेर राहावे, अशी अट न्यायालयाने घातली होती. या अटीनुसार, हा तरुण नेता येत्या सहा महिन्यांसाठी राजस्थानच्या उदयपूर शहरात राहील, असे त्याच्या वकिलाने स्थानिक न्यायालयाला सांगितले.