‘आधार कार्ड’द्वारे लाभार्थीच्या खात्यात थेट जमा होणाऱ्या सरकारी अनुदान, वेतनांतर्गत विविध खात्याच्या २९ योजनांचा समावेश केंद्र सरकारने केला आहे. त्यासंदर्भातील घोषणा मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी येथे केली. सरकारी योजनांचा लाभ देणाऱ्या ४२ योजना असून त्यापैकी २९ योजनांमधील निधी १ जानेवारी २०१३ पासून देशभरातील ५१ जिल्हांमधून उपलब्ध होईल. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्य़ांचा त्यात समावेश आहे. सध्या देशभरात २१ कोटी ‘आधार कार्ड’धारक आहेत.
शिष्यवृत्ती, निवृत्तीवेतन, रोजगारभत्ता आदींपोटींचे सरकारी लाभाचे वेतन नव्या वर्षांपासून देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्याच आठवडय़ात पुण्यातील एका कार्यक्रमात केली होती. मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चिदम्बरम यांनी माहिती दिली की,  ‘आधार कार्ड’धारकांच्या बँक खात्यात सरकारी अनुदानाची, वेतनाची रक्कम या मोहिमेद्वारे थेट जमा होईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील ५१ जिल्हे असतील. त्यात महाराष्ट्रातील बृहन्मुंबई, पुणे, नंदुरबार, वर्धा व अमरावती या पाच जिल्ह्य़ांचा समावेश असेल.