भारताच्या लोकसंख्येतील हिंदूंच्या टक्केवारीत लक्षणीय घट झाल्याचे २०११ मध्ये करण्यात आलेल्या धार्मिक जनगणनेमधील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या आकडेवारीनुसार हिंदूंचे प्रमाण ८० टक्क्यांहूनही खाली गेले आहे. मात्र ही टक्केवारी अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर अथवा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ती जाहीर होण्याची शक्यता आहे.
आकडेवारीनुसार हिंदूंचे प्रमाण एकूण लोकसंख्येपैकी ७८.३५ टक्केइतके झाले आहे. हेच प्रमाण २००१ मध्ये ८०.४५ टक्के इतके होते, तर २००१ ते २०११ या कालावधीत हिंदूंचे प्रमाण ८२.७५ कोटींवरून ९४.७८ कोटी इतके म्हणजे १४.५ टक्क्यांनी वाढले आहे.
धार्मिक जनगणनेनुसार (२०११) मुस्लिमांच्या टक्केवारीत विशेषत: सीमेवरील राज्यांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. मुस्लीम लोकसंख्येची टक्केवारी २४.४ टक्के इतकी वाढली आहे. २००१ ते २०११ या कालावधीत हे प्रमाण १३.८ कोटींवरून १७.१८ कोटींवर गेले आहे. गेल्या पाच दशकांत हिंदूंच्या टक्केवारीच्या प्रमाणात फाळणीनंतर (१९५१ ते २००१) ३.६५ टक्के बिंदूंची घसरण झाली आहे.
शीख आणि ख्रिश्चनांची आकडेवारी प्रत्येकी दोन टक्क्यांनी वाढल्याचे म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात स्थिर असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वातंत्र्यानंतर २०११च्या जनगणनेनुसार हिंदूंचे प्रमाण ५.७५ टक्के  बिंदूंनी घसरले आहे तर मुस्लिमांचे प्रमाण चार टक्के  बिंदूंनी वाढले आहे.