चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचे नाव ‘क्षी’हे इंग्रजीत xi असे लिहिले जाते मात्र बातमी देताना हा उच्चार क्षी जिनपिंग असा न करता ‘इलेव्हन जिनपिंग’ असा केला गेला. तोही दूरदर्शन या भारत सरकारच्या प्रसार माध्यमातील निवेदिकेकडून. त्यामुळे तिला बडतर्फ करण्यात आले आहे.
क्षी यांच्या भारत दौऱ्याचा मोठा गवगवा माध्यमांतून होत होता. गुरुवारी रात्री या दौऱ्याच्या घडामोडींची वार्ता देताना ही चूक झाली. दूरदर्शनने शुक्रवारी या निवेदिकेची बडतर्फी केल्याचे ट्विटरवरून जाहीर केले, मात्र तिचे नाव जाहीर केले नाही.
सरकारी बातम्या!
दरम्यान, दूरदर्शन आणि आकाशवाणी ही प्रसार माध्यमे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असल्याने मंत्र्यांनी तसेच सरकारी विभागांनी आपल्या विभागातील लोकोपयोगी कामांच्या प्रसिद्धीसाठी त्यांचा वापर करावा, असे आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने  केले आहे. माहिती आणि प्रसारण सचिव विमल जुल्का यांनी तसे पत्रच सर्व मंत्रालयांना पाठविले आहे. बातम्या आणि जाहिरातींच्या स्वरूपात सहभागाचे आवाहन त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस राजवटीत या माध्यमांवरून होणाऱ्या सरकारी प्रसिद्धीवर तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपने सातत्याने टीका केली होती.