परदेशी जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं पण ते कसं पूर्ण करावं याचा काहीही निश्चित आराखडा त्यांच्याकडे नसतो. फक्त परदेशी जायचंय या वेड्या आशेने अशी लोकं भारतातून निघतात खरी पण मग ते एका विचित्र चक्रात अडकतात.

अशाच एका वाईट परिस्थितीत हैदराबादची महिला अडकली आहे. आखाती देशांमध्ये नोकरी देतो असं आमिष दाखवत तिला आखाती देशात नेऊन चक्क विकण्यात आल्याचं वृत्त समोर आलंय.

हैदराबादच्या सलमा बेगम या महिलेला अशा पद्धतीने फसवण्यात आलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अक्रम आणि शफी या दोघा एजंटांनी ‘तुला सौदी अरेबियामध्ये घरकामगाराची नोकरी मिळवून देतो’ असं आमिष दाखवत तिला तिथे नेलं. तिच्यासाठी एक ‘स्पॉन्सर’ही तयार केला. या ‘स्पॉन्सर’च्या घरी सलमा बेगमला मोलकरीण म्हणून काम देण्याची लालूच या एजंटांनी तिला दाखवली.
प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर त्या ‘स्पॉन्सर’ पुरूषाने या दोघा एजंटांना ३ लाख रूपये दिले. आणि सलमा बेगमला आपल्याशी ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’ करावं लागेल अशी सक्ती केली. सलमा बेगमने अर्थातच याला नकार दिला. पण तोपर्यंत तिचा पासपोर्ट या माणसाने स्वत:कडे घेतल्याने सलमा बेगमला भारतात परतणं अशक्य झालं. तिच्या मुलीला केलेल्या एका फोनवरून सलमाने तिला विकण्यात आल्याचं सांगितलं. सौदी अरेबियातल्या एका कायद्याचाही तिला फटका बसला.

सौदी अरेबियामध्ये हंगामी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या मालकाच्या परवानगीशिवाय देश सोडता येत नाही. अशी परवानगीही तिला द्यायला या नराधमाने नकार दिला. सलमाला सौदी अरेबियाला पाठवणाऱ्या एजंटांनी अशा कुठल्याही प्रकाराची तिला कल्पना दिली नव्हती. आज सलमा बेगमचा सौदी अरेबियामध्ये छळ होतो आहे.

शफी आणि अश्रफ हे दोघे एजंट बिनदिक्कतपणे हैदराबादमध्ये फिरत असून सलमा बेगमच्या मुलीने आणि इतर कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केल्यावरही त्यावर काहीच कारवाई झालेली नाही.

सलमा बेगमने आपल्या मुलीला पाठवलेल्या एका आॅडिओ मेसेजमध्ये तेलंगण सरकार आणि केंद्र सरकारने आपल्याला भारतात परतण्यासाठी मदत करावी अशी याचना केली आहे.

परदेशी जाण्याचं स्वप्न बाळगणं गैर नाही पण त्याआधी सगळ्या गोष्टींची खातरजमा करून घेणंही आवश्यक आहे हेच यावरून स्पष्ट होतं आहे.