लिंग समानतेसाठी प्रसिद्ध असलेल्या आईसलँडमध्ये वेतनात केल्या जाणाऱ्या लिंगभेदाबद्दल महिलांना मोर्चा काढावा लागला. पुरूषांच्या तुलनेत १४ ते १८% कमी वेतन मिळत असल्याने येथील महिला कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.२४) दुपारी २.३८ नंतर कार्यालयातील कामबंद करून मोर्चा काढला. या आंदोलनात हजारो महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. या वेळी महिलांच्या हातात फलक होते. त्यांनी आपल्या अन्यायाविरोधात घोषणा दिल्या.
विशेष म्हणजे लिंग समानतेबाबत आईसलँडचा वरचा क्रमांक लागतो. परंतु पुरूषांच्या तुलनेत कमी वेतन मिळत असल्याच्या कारणावरून महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे या देशात अजूनही सुधारणेला वाव असल्याचे दिसून येते.

आशिया खंडात समान काम करणाऱ्या दोन अब्ज महिलांना आजही पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते. नेपाळ, बांगलादेश, चीनमधील पुरुषांच्या तुलनेत दक्षिण कोरियामधील महिलांना केवळ ५१ व जपानमध्ये ६० टक्के वेतन मिळते. इकॉनॉमिक फोरम व अन्य स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला नेतृत्व सर्वांत सशक्त असलेल्या देशात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, द फिलिपीन्स, श्रीलंका व मंगोलिया यांचा समावेश होतो. तर भारत, पाकिस्तान, नेपाळ, दक्षिण कोरिया व कंबोडिया या देशांत ही मोठी दरी आहे.