पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतीय सैन्याने पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला जात असला तरी यापूर्वी २०११ मध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही पाकमध्ये घुसून सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केले होते अशी माहिती समोर आली आहे. ऑपरेशन जिंजर नावाने ही मोहीम राबवण्यात आली होती. या मोहीमेत भारताने पाकिस्तानच्या तीन जवानांचे शिर कापून भारतात आणले होते.
द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार २०११ मध्ये भारतीय सैन्याच्या २५ जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. लष्कराचे निवृत्त मेजर जनरल ए के चक्रवर्ती यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानी सैन्याने ३० जुलै २०११ मध्ये कुपवाडा येथे भारतीय सैन्याच्या राजपूत आणि कुमाऊ रेजिमेंटच्या तुकडीतील सहा जवानांवर हल्ला केला होता.पाकिस्तानी जवानांनी भारताच्या दोन जवानांचे शिर कापून स्वतःसोबत नेले होते. काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणा-या एका दहशतवाद्याचा खात्मा झाला होता. या दहशतवाद्याकडे एक व्हिडीओ क्लिप आढळली होती. यामध्ये पाकिस्तानी जवान भारतीय जवानाचे शिर मधोमध ठेवून त्याभोवती फिरताना दिसत होते. हा प्रकार बघून सैन्याच्या गोटात संतापाची लाट उसळली आणि मग सैन्याने यााचा बदला घेण्याचा निर्धार केला. भारतीय सैन्याने ऑपरेशन जिंजर ही मोहीम तयार केली होती. या मोहीमेत लष्कराने पाकिस्तानच्या तीन चौक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. जोर, हिफाझत आणि लष्दत या चौक्यांना सैन्याने लक्ष्य केले होते.
२९ ऑगस्टला सैन्याचे विशेष प्रशिक्षित २५ जवान लाँचिग पॅडवर दाखल झाले. ३० ऑगस्टला पहाटे चारच्या सुमारास या जवानांनी पाकमध्ये घुसून भूसुरुंग पेरले. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानच्या आठ जवानांचा खात्मा केला. यातील तीन जवानांचे शिर भारतात आणले असा दावा हिंदूच्या वृत्तात करण्यात आला आहे. सकाळी सातच्या सुमारास सुरुवातीला चार पाकिस्तानी जवान भूसुरुंग स्फोटामुळे जखमी झाले आणि यानंतर लपून बसलेल्या भारतीय जवानांनी पाक जवानांवर गोळीबार करत त्यांचा खात्मा केला.
हिंदूच्या वृत्तावर केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र यूपीए सरकारच्या कार्यकाळातही सर्जिकल स्ट्राईक केले गेले फक्त ते जाहीर करण्यात आले नव्हते असा दावा काँग्रेसने केला होता.