भारत देश रशियन नागरिकांसाठी सुरक्षितच असल्याचा खुलासा पणजीतील रशियन माहिती केंद्राकडून रविवारी करण्यात आला. रशियातील सरकारने देशातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी परदेश प्रवासासाठीची सुरक्षित स्थळांची यादी अद्ययावत केली असून, त्यामधून भारताला वगळण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पणजीतील रशियन माहिती केंद्राने हा खुलासा केला. रशियन सरकारच्या निवेदनाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे माहिती केंद्राने म्हटले आहे.
माहिती केंद्राच्या प्रमुख कॅटेरिना बेल्याकोव्ह म्हणाल्या, रशियातील संसदेचे उपाध्यक्ष इव्हान मेलनिकोव्ह यांनी परदेशातील प्रवासासाठी सुरक्षित असलेल्या स्थळांची यादी अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये क्युबा, दक्षिण व्हिएतनाम आणि दक्षिण चीनमधील काही भागांचा समावेश करण्यात आला. मात्र, सुरक्षित पर्यटनस्थळांच्या यादीतून आम्ही भारताला वगळलेले नाही. त्याचबरोबर असुरक्षित देशांच्या यादीमध्ये आम्ही भारताचा समावेशही केलेला नाही. यासंदर्भात भारतातील काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले.