माऊंट एव्हरेस्टवर बेपत्ता झालेल्या भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. रविकुमार या भारतीय गिर्यारोहकाचा मृतदेह मुख्य मार्गापासून २०० मीटरखाली सापडला असून या वृत्तानंतर रविकुमार यांच्या गावी शोककळा पसरली आहे.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील गिर्यारोहक रविकुमार हा  माऊंट एव्हरेस्ट मोहीमेवर गेला होता. विशेष म्हणजे शनिवारी दुपारी रविकुमारने जगातील सर्वोच्च शिखर सरही केले होते. शिखर सर करुन परतत असताना रविकुमार बेपत्ता झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. सोमवारी रविकुमारचा मृतदेह सापडला. दक्षिण शिखरावर चढाई करण्यापूर्वीच्या बाल्कनी परिसरापासून २०० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह सापडल्याचे नेपाळमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. शिखरावर चढाई करण्यापूर्वीच्या अंतिम विश्राम थांब्याला बाल्कनी भाग असे म्हटले जाते.

रविकुमारसोबत गेलेले क्लायम्बिंग गाईड लेक्पा वोंग्या शेरपा हेदेखील हिमबाधा होऊन बेशुद्धावस्थेत आढळले होते. तेव्हापासून रविकुमार यांचा शोध सुरु होता. रविकुमार सुखरुप असावा यासाठी देशभरात प्रार्थनाही सुरु होती. रविकुमारच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्याच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. नेपाळमधून माऊंट एव्हरेस्ट सर करताना मृत्यू झालेल्यांचा आकडा आता पाचवर पोहोचला आहे. रविवारी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अन्य दोन देशांमधून आलेल्या गिर्यारोहकांचाही माऊंट एव्हरेस्टवर मृत्यू झाला होता.