पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवडय़ात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात असून एकेकाळी लिट्टेंचा गड मानला जाणाऱ्या जाफना शहराला ते भेट देणार आहेत. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात ते श्रीलंकेच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत.
श्रीलंकेचे आरोग्यमंत्री रजिता सेनारत्ने यांनी पत्रकारांना मोदी यांच्या दौऱ्याविषयी माहिती दिली. मोदी प्रथम श्रीलंकेच्या उत्तर भागातील जाफना भागाला भेट देतील व नंतर संसद सदस्यांना संबोधित करतील. याशिवाय, ते बौध्द धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेल्या अनुराधापूरलाही भेट देतील. जाफना भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान, तर दुसरे देशप्रमुख ठरणार आहेत. या अगोदर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये जाफनाला भेट दिली होती. जाफनाच्या संघर्षग्रस्त भागात भारताने पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीला सुरुवात केली असून त्यात ५० हजार घरांचा समावेश आहे.
श्रीलंकेचे नवे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्या भारतभेटीनंतर महिन्याभरात मोदी यांचा श्रीलंका दौरा होत आहे. दोन देशांमधील संबंध सुधारणे व चीनच्या बाजूने असलेल्या लंकेच्या धोरणात बदल होणे, या दृष्टीने या दौऱ्याकडे बघितले जात आहे.

सुषमा स्वराज आजपासून श्रीलंकेत
 पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उद्यापासून श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहेत. या दोन दिवसात त्या श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमासिंघे व परराष्ट्रमंत्री मंगला समरवीरा यांची भेट घेतील.