भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अनेक देशांच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करुन कोट्यवधींची कमाई करत आहे. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकलच्या (पीएसएलव्ही) माध्यमातून एकाचवेळी २८ देशांचे २०९ उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम इस्रोच्या नावावर आहे. इस्रोने २३ जून रोजी पीएसएलव्ही सी ३८ च्या मदतीने कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. विशेष म्हणजे भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण करताना इस्रोने याचवेळी १४ देशांचे २९ उपग्रह अवकाशात सोडले. या माध्यमातून इस्रोचा व्यावसायिक विभाग असलेल्या एँट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडने ४५ कोटींची कमाई केली आहे. तर २०१३ ते २०१५ या कालावधीत इस्रोने ६०० कोटींची रग्गड कमाई केली आहे. बुधवारी सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे.

२३ जून रोजी पीएसएलव्हीच्या माध्यमातून इस्रोने कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहाचे प्रक्षेपण केले. याआधी १५ फेब्रुवारीला पीएसएलव्ही सी३७ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने इस्रोने एकाचवेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. मात्र या प्रक्षेपणातून इस्रोने नेमकी किती कमाई केली, याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. अंतराळातील कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पेसएक्सची फाल्कन ९, रशियाची प्रोटॉन यूएलए आणि एरियनस्पेस यासारख्या कंपन्या या क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहेत. मात्र इस्रो स्वस्त दरात ही सेवा पुरवत असल्याने इस्रोच्या एँट्रिक्स कॉर्पोरेशनने उपग्रह प्रक्षेपण बाजारपेठेत दबदबा निर्माण केला आहे. लहान उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचे नैपुण्य इस्रोने मिळवले आहे. त्यामुळेच अनेक परदेशी कंपन्या स्पर्धेत असूनही इस्रोला प्राधान्य दिले जाते. ‘खर्च कमी आणि यशाची हमी’ या सूत्रामुळे इस्रोने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे.

२०१५-१६ मध्ये इस्रोच्या एँट्रिक्स कॉर्पोरेशनने परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून २३० कोटी रुपयांची कमाई केली. २०१३ ते २०१५ या कालावधीत इस्रोने २८ परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. यातून एँट्रिक्स कॉर्पोरेशनने ६०० कोटींची रग्गड कमाई केली आहे. उपग्रह प्रक्षेपण क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केल्यास यामध्ये २०० अब्ज डॉलरची (१२,८७१ अब्ज रुपये) उलाढाल होते. सध्या या बाजारपेठेतील इस्रोचा हिस्सा केवळ ०.६ टक्के इतका आहे. मात्र इस्रोची जागतिक स्तरावरील सध्याची प्रतिमा पाहता येत्या काळात इस्रो मोठ्या प्रमाणात कमाई करण्याचा अंदाज आहे.