केंद्राच्या उत्पन्न घोषित योजनेनुसार १३, ८६० कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर करणारा गुजरातमधील उद्योजक महेश शहा (६७) गूढरित्या बेपत्ता झाला होता. परंतु आयकर विभागाच्या महेश शहा याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. गेल्या सात दिवसांपासून तो गायब होता. आयकर विभागाला आज (शनिवारी) सांयकाळच्या सुमारास ताब्यात घेण्यात यश आले.

महेश शहाने आपल्या संपत्तीचा खुलासा केला असला तरी त्याने याचा दंड भरला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून तो गायबही होता. आयकर विभागाकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. महेश शहा एका वृत्त वाहिनीच्या कार्यालयात गेला. तिथे त्याने आपण कमिशनच्या लालसेपोटी काही लोकांच्या सांगण्यावरून अघोषित संपत्तीचा खुलासा केल्याचे म्हटले. त्या लोकांचे नाव आयकर विभागाला सांगणार असल्याचे त्याने या वेळी म्हटले.
तो म्हणाला, मी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या सर्व लोकांचे नाव सांगणार आहे. मी कुठेही पळून गेलो नव्हतो. परंतु काही कारणास्तव मी माध्यमांपासून दूर होतो. ज्या लोकांनी आपल्या संपत्तीचा खुलासा केला होता. त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे मी कराचा पहिला हप्ता भरू शकलो नाही. लवकरच याचा सर्व खुलासा मी करेन. ज्या लोकांच्या संपत्ती खुलासा करण्यात आला आहे. ते सर्व व्यापारी व राजकीय क्षेत्रातील आहेत. मी चूक केली आहे, पण त्याचाही लवकरच खुलासा होईल. या सर्व प्रकरणात सत्याचाच विजय होईल.

अहमदाबादमधील जुन्या इमारतीत फोर बीएचके फ्लॅटमध्ये राहणारा महेश शहा हा रिक्षाने कामावर जात असत. त्याने शेजाऱ्यांकडूनही उसने पैसे घेतले होते. गेल्या दोन -तीन वर्षांत त्याने आयकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न)मध्ये वर्षाला दोन ते तीन लाख उत्पन्न असल्याचे जाहीर केले होते. आयकर विभागाने शहा याचे घर आणि त्याचा सीए तहमूल सेठना यांचे कार्यालय आणि घरी २९ नोव्हेंबरपासून १ डिसेंबरपर्यंत तपासणी केली. आयकर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच शहासोबत अखेरचे बोलणे झाले. त्यानंतर शहा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असे सेठना यांनी सांगितले.

शहा याच्या व्यावसायिक भागीदारांकडून ४० लाखांची रोकड आणि ३० लाखांचे दागिने जप्त केले आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मी कधीही शहा याचा इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला नाही. शहाकडे मोठ्याप्रमाणात रोकड आहे. शहाचे काही राजकीय व्यक्तींसह व्हीआयपी लोकांशी चांगली ओळख आहे. त्यांची ऊठबस मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्येच असते, अशी माहिती सेठना यांनी दिली.

केंद्र सरकारच्या अघोषित संपत्ती जाहीर करण्याच्या योजनेच्या शेवटच्या दिवशी शहा यांनी संपत्ती जाहीर केली होती. ‘उत्पन्न प्रकटन योजना २०१६’नुसार काळ्या पैशासंबंधी स्वेच्छेने खुलासा करणा-यांना सवलत देण्यात आली होती. या योजनेनुसार अघोषित संपत्ती जाहीर करणा-यांना ३० नोव्हेंबरपर्यंत कराचा पहिला हप्ता भरावा लागणार होता. शहा यांना ४, ६०० कोटी रुपये ऐवढा कर भरावा लागणार होता. या करातील ९७५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता ३० नोव्हेंबरपर्यंत द्यायचा होता. मात्र शहा यांनी हप्ता भरण्यास दिरंगाई केली होती.