जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील केरन सेक्टरमधील सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळला. नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावताना जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. तत्पूर्वी पूंछ सेक्टरमधील खारी करमारा येथे पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. भारतीय जवानांनीही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

दरम्यान, आज पहाटेच भारतीय जवानांनी पुलवामा जिल्ह्यातील काकापोरामध्ये कारवाई करत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये काल (बुधवारी) संध्याकाळी ६ वाजल्यापासून संघर्ष सुरु होता. यानंतर लष्कराने परिसराला घेराव घातला होता. शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराचे ‘ऑपरेशन’ सुरु झाले होते. पहाटे तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर मोहीम थांबवली. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथे गस्ती पथकाच्या जवानांना दोन दहशतवादी कारमधून जाताना दिसले होते. यानंतर सुरक्षा दलाला या घटनेची माहिती देण्यात आली होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला वेढा घातला आणि परिसरात शोधमोहीम सुरु केली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला होता. दरम्यान, या चकमकीत राष्ट्रीय रायफल्सचा एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.