जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या घटना रोखण्याचा नरेंद्र मोदी सरकारच्या संकल्पाचा पुनरुच्चार सत्ताधारी भाजपच्या एका नेत्याने केला आहे. जे तरुण बंदूक हाती घेतील, त्यांना गोळी लागण्याचा धोका असेलच, असा इशाराही या नेत्याने दिला आहे. दगडफेक करणारे सभ्य समाजाचा भाग असूच शकत नाहीत, असे मतही त्यांनी काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले. काश्मीरमध्ये हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या फुटीरतावाद्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. काश्मीरमध्ये तणाव असलेल्या भागांतील परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकते आणि सरकार त्या दिशेने काम करत आहे, असे भाजपच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील समस्येवर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. या घटनांमुळे खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण आहे. हिंसेच्या घटनांतून दहशतवादाला खतपाणी घालण्याचा उद्देश साध्य केला जात आहे. तसेच निदर्शकांना आर्थिक आणि अन्य मदत करण्याची पाकिस्तानची भूमिका यामुळे केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. निदर्शकांना चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार सरकारने केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील बिकट झालेल्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राजनैतिक प्रक्रिया सुरू करण्याची मागणी मान्य करणे म्हणजे फुटीरतावाद्यांच्या इशाऱ्यावर कृती करण्यासारखे होईल, असे भाजपच्य़ा नेत्यांना वाटत आहे. पण फुटीरतावाद्यांना खोऱ्यात शांतता नांदावी, असे कदापि वाटत नाही. दुसरीकडे, मागण्या मान्य केल्यास सरकार दहशतवादी आणि निदर्शकांसमोर झुकल्याचा संदेश जाईल, असेही नेत्यांना वाटते. पाकिस्तानचा अचानक दौरा करून पंतप्रधानांनी चर्चा आणि शांततेच्या मार्गावर पहिले पाऊल टाकले होते. पण समोरील देश बदलण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही भाजपच्या नेत्याने स्पष्टपणे सांगितले. सीमेवर नियंत्रण रेषेवर करण्यात येणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.