जपानने भारताला चेन्नई व अहमदाबाद मेट्रो रेल्वेसाठी ५४७९ कोटी रूपयांचे कर्ज देण्याचे जाहीर केले आहे, असे अर्थ मंत्रालयाने सांगितले. दोन्ही देशांनी या करारावर आधीच स्वाक्षऱ्या केल्या असून चेन्नई मेट्रोला १०६९ कोटी तर अहमदाबाद मेट्रोला ४४१० कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. काही वर्षांत भारत-जपान यांचे आर्थिक सहकार्य वाढले असून त्यात धोरणात्मक भागीदारीचा सहभाग वाढला आहे. भारत व जपान यांच्यात आर्थिक कामकाज सचिव एस. सेल्वाकुमार व जपानचे उपराजदूत युकाटा किकुटा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भारत पायाभूत प्रकल्पांना जास्त महत्त्व देत आहे. त्यात मेट्रो रेल्वेचा प्रमुख भाग असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल व हरितगृह वायूंचे प्रमाणही कमी होईल. भारत आर्थिक साधनांसाठी द्विपक्षीय व बहुराष्ट्रीय मदतही घेत आहे.