संपूर्ण तामिळनाडूची ‘अम्मा’ म्हणजेच जयललिता यांचे सोमवारी रात्री निधन झाले. तामिळनाडू जनतेला शोक अनावर होत आहे. जनता रस्त्यावर उतरून आक्रोश करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोट्यवधी लोक जयललितांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी म्हणून देवाला प्रार्थना करताना दिसत होते. परंतु जयललिता यांचे दुर्दैव म्हणजे त्यांच्या अखेरच्या काळात त्यांच्या कुटुंबीयातील एकही व्यक्ती त्यांच्या जवळ नव्हता. जयललितांचा भाऊ जयकुमार यांची मुलगी दिपाने जयललितांवर उपचार सुरू असताना त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना जयललितांना भेटू न देता परत पाठवले होते. गेल्या ७४ दिवसांपासून अपोलो रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जयललितांचे सोमवारी रात्री निधन झाले.
यापूर्वीही जयललितांच्या कुटुंबीयांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रत्येकवेळी त्यांची भेट होऊ शकली नाही. ऑक्टोबर २०१४ मध्ये जयललिता तुरूंगातून बाहेर आल्या होत्या. त्यावेळी दिपा आणि त्यांचे पती माधवन यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. भर पावसात दोघेही जयललितांचे स्वागत करण्यासाठी तुरूंगाबाहेर उभे होते. तिथे त्यांना भेटता आले नाही. नंतर ते पुन्हा जयललिता यांच्या घराबाहेर थांबले. परंतु तिथेही त्यांना अपयश आले. याबाबत दिपा म्हणाल्या, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे येत. त्यांच्यात आणि आमच्यात इतके अडथळे कसे आली याबाबत मला काही कल्पना नाही. विशेष म्हणजे दिपा यांचा जन्म जयललिता यांच्या पोएस गार्डन येथील घरात झाला होता.

जयललिता यांचे प्रारंभीचे जीवन कर्नाटकातील म्हैसूर येथे आपल्या आजी-आजोंबाकडे गेले. त्यानंतर त्या चेन्नई येथे आल्या. सप्टेंबर १९९५ मध्ये दत्तकपूत्र व्ही. एन. सुधाकरनच्या शाही लग्नानंतर त्यांच्या कुटुंबीयांत दुरावा निर्माण झाला. जयललिता यांची आई वेदा यांचा जन्म नेल्लोर येथे झाला होता. त्यांचे लग्न जयरमन यांच्याशी झाले. जयरमन हे म्हैसूरच्या महाराजांचे डॉक्टर होते. जयललिता आपले मामा श्रीनिवासन यांचा खूप आदर करत. त्या त्यांना चिनी मामा म्हणूनच हाक मारत. त्यांची मोठी मावशी बंगळुरू येथे एक शाळा चालवते. त्या अभिनेत्रीही आहेत. त्यांच्या दोन्ही मुली अमिता आणि जयंती या ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत असतात. त्यांची दुसरी मावशी अंबुजा आणि त्यांचे पती कन्नन यांना मूल नाही. ते अनेकवर्षे जयललिता यांच्याबरोबर राहत होते. त्यांची सर्वात छोटी मावशी पदमिनी बंगळुरूमध्ये राहते. सन २०११ मध्ये त्यांचे निधन झाले. दिपा यांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यात त्यांच्या कुटुंबीयातील अनेकजण सहभागी झाले होते. परंतु जयललिता या मात्र आल्या नव्हत्या.
दिपा यांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांचा भाऊ दिपक याने अमेरिकेत एमबीए केले आहे. आता तो चेन्नईत स्वत:ची कंपनी चालवतो. सन १९९५ मध्ये दिपाच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यावेळी जयललिता त्यांच्या घरी गेल्या होत्या. परंतु दिपाच्या आईच्या निधनावेळी त्या आल्या नव्हत्या.
मी नातेसंबंध कायम राहावेत यासाठी भरपूर प्रयत्न केले. कदाचित त्यांना वेळ मिळू शकला नसेल, अशी खंत दिपा यांनी या वेळी बोलून दाखवली.