संयूक्त जनता दलातील नितीश कुमार आणि शरद यादव यांच्यातील कटुता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांनी आता एकमेकांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. राज्यसभेतील पक्षनेते पदावरून हटवल्यानंतर शरद यादव यांनी शनिवारी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर हल्लाबोल करत जेडीयू हा फक्त नितीश कुमारांचा पक्ष नसल्याचे म्हटले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यादव यांचा बंडाचा पावित्रा पाहता पक्ष दुभंगणार हे निश्चित असल्याचे समजते.

शरद यादव यांनी बिहारमध्ये तीन दिवसीय संवाद यात्रेच्या अखेरच्या दिवशी माधेपुरा येथे नितीश कुमारांवर टीका केली. जेडीयू हा फक्त नितीश कुमार यांचा पक्ष नाही. हा माझाही पक्ष आहे. मी या संवाद यात्रेत लोकांशी संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना नितीश कुमार यांची भाजपशी हातमिळवणी करून सरकार बनवण्याबाबतची आपली व्यथा सांगितली.

नितीश हे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष असून पक्षावर त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. यादव म्हणाले, बिहारमध्ये दोन जेडीयू आहेत. एक सरकारी आणि दुसरी जनतेची. पक्षाचे काही आमदार, नेते हे आपल्या वैयक्तिक हितासाठी सरकारच्या जवळ आहेत, नितीश यांच्याबरोबर आहेत. पण जो नेता जनता आणि कार्यकर्त्यांच्या जवळचा आहे. तो माझ्यासोबत आहे.

यादव यांच्या या वक्तव्यामुळे जेडीयूत फूट पडणार हे निश्चित असल्याचे मानले जाते. परंतु, यादव यांनी राज्यसभेचे पक्षनेतेपदावरून काढल्याबाबत काही भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले, मी इंदिरा गांधींना घाबरलो नाही तर इतरांना घाबरायचं काय कारण. मी सत्य बोलण्यास कधीच घाबरत नाही. मी आपल्या तत्वांवर कायम असतो.

मला साथ देत असलेल्या काही नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. नितीश यांच्याबरोबर उभे असलेले काही नेते माझ्या नेत्यांना धमकावत आहेत असे सांगत आपण अजनूही महाआघाडीत कायम असल्याचे म्हटले. बिहारच्या ११ कोटी जनतेने २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला पाच वर्षांसाठी मतदान केले होते.

भाजपबरोबर हातमिळवणी करणे आणि बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय बिहारच्या बहुमताविरोधात होता. राज्यातील जनतेने २०१५ मध्ये राष्ट्रीय जनता दल, जेडीयू आणि काँग्रेसला ५ वर्षांसाठी बहुमत दिले होते. जनतेाचा कौल भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीच्या विरोधात होता.