अपुऱ्या रोजंदारीबाबत झारखंडमधील कर्मचाऱ्यांकडून पंतप्रधानांना उपरोधिक पत्र

झारखंडमधील लतेहारच्या मनिका गटातील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी  कर्मचाऱ्यांनी (मनरेगा) त्यांना दिलेली पाच रूपयांची किरकोळ वाढ मे दिनी पाकिटात पाच रू. टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत केली आहे. या पाकिटात एक पत्र असून त्यात ग्रामस्वराज मजदूर संघाच्या कामगारांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने मनरेगाच्या रोजंदारी वेतनात केलेली वाढ फारच किरकोळ आहे. केंद्र सरकारकडे कदाचित तेवढा पैसा नसावा अन्यथा त्यांनी हे किमान रोजंदारी वेतन झारखंडच्या २१२ रूपये या किमान वेतनाइतके तरी ठेवले असते.

मनरेगामध्ये किमान वेतन झारखंडमध्ये १६२ रूपये असून ते वाढवून १६७ रूपये करण्यात आले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, तरी आम्ही भाग्यवानच, कारण इतर राज्यांमध्ये रोजंदारी वेतन पाच रूपयांपेक्षाही कमी वाढवण्यात आले आहे. ओडिशाच्या रोजंदारी कामगारांची स्थिती कदाचित चांगली असावी म्हणून की काय सरकारने त्यांना वाढच दिलेली नाही.

यात महिला व कामगारांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारचा खर्च कदाचित जास्त असेल त्यामुळे वेतनात वाढ दिली नसेल. हे सगळे अर्थातच उपरोधाने लिहिले आहे. आम्ही पाच रूपये वाढ तुम्हाला परत पाठवत आहोत, त्यातून तुम्ही कंपन्या, मित्र, व कर्मचारी यांना खूश कराल अशी आशा वाटते. काल मे दिनानिमित्त मनरेगा कामगारांनी ग्राम स्वराज मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.  त्यांनी अपुऱ्या रोजंदारीबाबत बैठकही घेतली व त्यात निषेध व्यक्त करण्यात आला.