देशाच्या दृष्टिकोनातून ब्रेग्झिटचा निर्णय घातकच आहे, तो अनपेक्षित निर्णय होता,    पण आता यामुळे ग्रेट ब्रिटनचे तुकडे होतील व स्कॉटलंड बाहेर पडेल, असे युरोपीय महासंघात ब्रिटनने राहावे याचे समर्थन करणाऱ्या हॅरी पॉटरच्या प्रसिद्ध लेखिका जे. के. रोलिंग यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, की अशी काही जादू घडेल असे अपेक्षित नव्हते पण जे घडायचे ते घडले. आता ग्रेट ब्रिटनमधून स्कॉटलंडही स्वतंत्र होईल. ब्लर गटाचे गायक डॅमन अलबर्न यांनी काळी फीत लावून ग्लॅटनबरी येथे कार्यक्रम केला. त्यांनी हजारो रसिकांना सांगितले, की लोकशाहीने आपल्याला खोटे पाडले आहे. कारण ही लोकशाहीच निकोप पायावर उभी नाही. सिक्टीज लिजंड मॅरियन फेथफुल यांनी सांगितले, की ही परिस्थिती अजूनही टाळता येईल, त्यासाठी संसदेने काहीतरी करावे. मला वाईट वाटले. आता आम्ही पुन्हा उजव्या विचारसरणीच्या लिटल इंग्लंडकडे परत आलो आहोत. हे सगळे भीतिदायक आहे. फॅशन डिझायनर कार्ल लॅजरफेल्ड यांनी सांगितले, की ग्रामीण मतदारांनी हा सगळा गोंधळ केला आहे, त्यामुळे ब्रिटनला युरोपीय महासंघातून बाहेर पडावे लागले. मोठय़ा शहरांना ब्रेग्झिट नको होते. मतदानाचे विश्लेषण केले तर हा निर्णय चुकीचा आहे, कल्पनाही चुकीची आहे. अलबार्न व रोलिंग यांच्या प्रतिक्रिया उर्मटपणाच्या आहेत असे सन वृत्तपत्राने म्हटले आहे. या वृत्तपत्राने ब्रेग्झिटचे समर्थन केले होते. द स्मिथ्सचे गिटारवादक जॉनी मार यांनी सांगितले, की पुन्हा जनमत घेण्याच्या याचिकेवर २० लाख सहय़ा झाल्या आहेत, त्यावर संसदेत चर्चा व्हावी.