भाजपचे आमदार प्रभू चव्हाण हे कर्नाटक विधानसभेत गुरुवारी शेतकऱ्यांच्या दुरवस्थेबाबत चर्चा सुरू असताना आपल्या मोबाइलवर प्रियंका गांधी यांचे छायाचित्र पाहण्यात गढले होते, हे सीसीटीव्हीने उघड झाल्यावरून शुक्रवारी काँग्रेस आमदारांनी जोरदार गदारोळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम दहा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
भाजपचे अन्य एक आमदार यू. बी. बनकर हेदेखील गंभीर चर्चा सुरू असताना मोबाइलवर खेळण्यात दंग होते, असेही सीसीटीव्हीने उघड केले आहे. त्यामुळे या दोघांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र मंत्री एम. एच. अंबरीश आणि काँग्रेस आमदार एस. एस. मल्लिकार्जुन हे दोघेही चर्चा सुरू असताना मोबाइलवर दंग होते, असा आरोप भाजपनेही केला.