दोन व्यक्तींनी महिलेवर बलात्कार केला तर त्याला सामूहिक बलात्कार म्हणता येणार नाही. सामूहिक बलात्कारासाठी किमान चार व्यक्ती तरी हवेत, असे बेताल वक्तव्य करून कर्नाटकचे गृहमंत्री के.जे.जॉर्ज यांनी वाद ओढावून घेतला आहे. बंगळुरूत एका कॉलसेंटरमध्ये काम करणाऱया २२ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. या घटनेवर प्रतिक्रिया देताना के.जे.जॉर्ज यांनी ‘तुम्ही या प्रकरणाला सामूहिक बलात्कार कसं काय म्हणू शकता? सामूहिक बलात्काराला किमान चार ते पाच व्यक्ती हवेत’, असे अकलेचे तारे तोडले. जॉर्ज यांच्या विधानानंतर विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून टीका होण्यास सुरूवात झाली. तर, राष्ट्रीय महिला आयोगाने जॉर्ज यांना त्यांनी केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण देण्यासंदर्भात नोटीस धाडली. मग, जॉर्ज यांनी अखेर आपल्या विधानावर आज माफीनामा सादर केला. मात्र, महिलांवर होणाऱया अत्याचाराबाबत विशेषत: बलात्कारासारख्या घटनांवर राजकीय नेत्यांकडून वारंवार होणाऱया वादग्रस्त वक्तव्यांमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.