आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मोठय़ा रकमेची लाच घेऊन एका कॅनडियन कंपनीला गॅस क्षेत्राचे कंत्राट दिल्याबद्दल भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्या खालिदा झिया या सोमवारी शरणागती पत्करून येथील कनिष्ठ न्यायालयात हजर राहणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खालिदा झिया या सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता विशेष न्यायाधीशांसमोर हजर राहतील, असे त्यांचे वकील महबुबुद्दीन खोकोन यांनी सांगितले. कॅनडाच्या ‘निको’ कंपनीला बेकायदेशीररीत्या कंत्राट देऊन देशाचे सुमारे १.७८ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे नुकसान केल्याबद्दल भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाने झिया यांच्यासह इतर १० जणांवर गुन्हा दाखल केला होता. तो रद्द करण्यात यावा, ही झिया यांची विनंती उच्च न्यायालयाने गेल्या जून महिन्यात फेटाळून लावली होती.