इस्लामी धर्मशास्त्रानुसार योग्य प्रक्रियेचे पालन न केल्याचा ठपका

इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे तलाक प्रक्रियेचे योग्य प्रकारे पालन न केल्याचा ठपका ठेवत येथील कुटुंब न्यायालयाने महिलेला देण्यात आलेला तोंडी तलाक रद्दबातल ठरवला आहे.

देवास येथे राहणाऱ्या तौसिफ शेख याचा १९ जानेवारी २०१३ रोजी आर्शी खान हिच्याशी निकाह झाला. काही काळानंतर तौसिफने आर्शीकडे माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. मात्र, तिने त्यास नकार दिला. जाच वाढल्यानंतर आर्शी तौसिफचे घर सोडून माहेरी रहायला गेली. आर्शीने पतीविरोधात हुंडाविरोधी कायद्यान्वये खटला दाखल केला. हा खटला अद्यापही प्रलंबित आहे. दरम्यान, ९ ऑक्टोबर २०१४ रोजी अन्य काही खटल्यांच्या निमित्ताने तौसिफ आणि आर्शी येथील न्यायालयात आले असता तौसिफने न्यायालयाच्या आवारातच आर्शीला तोंडी तिहेरी तलाक दिला. आर्शीने त्यास न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने तौसिफकडे याबाबत विचारणा केली असता न्यायालयाला त्याने दिलेल्या लेखी उत्तरात अनेक विसंगती आढळल्या. न्यायालय परिसरात तोंडी तलाक दिला त्यावेळी आर्शी उपस्थित होती किंवा कसे याचे समाधानकारक उत्तर तौसिफ देऊ शकला नाही. त्यामुळे धर्मशास्त्राने आखून दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे तलाक न दिल्याबद्दल कुटुंब न्यायालयाने तौसिफने दिलेला तलाक रद्दबातल ठरवला. तौसिफने तलाक देण्यासाठी अमलात आणलेली प्रक्रिया ‘बेकायदेशीर’ आणि ‘कुचकामी’ होती, असे निरीक्षण कुटुंब न्यायालयाने नोंदवले.

दरम्यान, तलाक देताना तौसिफ याने कोणाचीही मध्यस्थी न घेत धर्मशास्त्राचे उल्लंघन केल्याचेही न्यायालयाचे म्हणणे आहे. तौसिफ याने कुटुंब न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. तौसिफने आर्शीला दिलेला तलाक इस्लामी धर्मशास्त्राला अनुसरून नसल्याचे न्यायालयाला पटवून देण्यासाठी धर्मशास्त्रातील अनेक उताऱ्यांचा संदर्भ न्यायालयापुढे सादर करण्यात आला.

कन्यारत्न झाल्याने दूरध्वनीवरून तलाक!

लखनौ : कन्यारत्न झाल्याचे समजताच संतप्त झालेल्या पतीने पत्नीला दूरध्वनीवरूनच तलाक दिल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. शुमला जावेद असे पीडित महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे शुमला या राष्ट्रीय पातळीवरील नेटबॉल खेळाडू आहेत. शुमला यांना कन्यारत्न झाल्याने संतापलेल्या त्यांच्या पतीने फोनवरूनच तीनदा ‘तलाक’ हा शब्द उच्चारत काडीमोड घेतला. सध्या माहेरी असलेल्या शुमला यांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी केली आहे.