राज्यातील शेतकरी संपावर गेले असतानाच दुसरीकडे मध्यप्रदेशमध्येही शेतकरी आंदोलन सुरु आहे. मंगळवारी मंदसौर जिल्ह्यात शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन शेतकरी जखमी झाले असून या घटनेमुळे मध्यप्रदेशमधील भाजप सरकारची डोकेदुखी वाढली आहे. तर पोलिसांनी गोळीबार केल्याचे वृत्त नाकाराले आहे.
शेतमालाला हमीभाव मिळाला यासाठी मध्यप्रदेशामध्येही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला मंदसौर जिल्ह्यात हिंसक वळण लागले. आंदोलक शेतकऱ्यांनी १० ट्रक, पोलिसांची गाडी आणि तीन बाईक जाळल्या. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकांनी जमावावर गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे. या गोळीबारात कन्हैय्यालाल पाटीदार आणि बंशी पाटीदार या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तीन जण या घटनेत जखमी झाले आहेत. पोलिसांनी मात्र गोळीबाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेनंतर पिपलीमंडी भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
रतलाम आणि मंदसौर जिल्ह्यातील अन्य भागांमध्येही शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटले. सुवासारा भागात जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तर याच जिल्ह्यातील दालोडा भागात शेतकऱ्यांनी रेल्वेरुळाचे आणि रेल्वे फाटकाचे नुकसान केले. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रतलाम, मंदसौर आणि उज्जैन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी गोळीबार केलाच नव्हता असा दावा मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गोळीबाराच्या घटनेनंतर मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. शेतकरी आंदोलनातील हिंसाचारामागे समाजकंटकांचा हात असल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता.
Madhya Pradesh: 2 farmers dead, 4 injured in firing that took place in Mandsaur during farmers' protest. pic.twitter.com/4HNPtksUBi
— ANI (@ANI) June 6, 2017