उत्तर प्रदेशात अन्न व सुरक्षा प्रशासनाने मॅगी नूडल्समध्ये घातक पदार्थ (अजिनोमोटो व शिसे) असल्याच्या कारणावरून नेस्ले इंडिया कंपनीला सुरक्षा मानक पाळत नसल्याबद्दल कंपनी व इतर पाच आस्थापनांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात खटला भरण्यास परवानगी दिली त्यानंतर अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असून त्यात इझी डे आऊटलेटचे व्यवस्थापक मोहन गुप्ता व शबाब आलम यांनाही प्रतिवादी केले आहे, तसेच मॅगीची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन, प्रीती झिंटा, माधुरी दीक्षित यांनाही स्वतंत्र खटल्यात ओढले आहे. मॅगीची जाहिरात करून देशातील तरूण पिढीचे आरोग्य बिघडवल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे असे स्थानिक वकिलांनी सांगितले. त्यांच्यावर ४२०, २७२, २७३ व १०९ ही कलमे लावण्यात आली आहेत.
अन्न सुरक्षा व औषध प्रशासन आयुक्त पी.पी.सिंह यांनी नेस्ले इंडिया विरोधात बाराबंकी येथील स्थानिक न्यायालयात खटला भरण्यास परवानगी दिली असल्याची माहिती बाराबंकीचे अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. के. पांडे यांनी दिली. हा खटला शनिवारी किंवा पुढच्या आठवडय़ात दाखल होण्याची शक्यता आहे.