ज्येष्ठ पुत्र हरिलाल यांच्या एकूण वादग्रस्त वर्तनामुळे कमालीचे व्यथित होऊन त्यांना महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या पत्रांचा आता इंग्लंडमध्ये पुढील आठवडय़ात लिलाव होणार आहे.
श्रॉपशायर कौण्टी येथील ‘मलॉक ऑक्शनियर्स’ यांनी या पत्रांच्या लिलावाचा घाट घातला असून महात्मा गांधी यांनी जून १९३५ मध्ये हरिलाल यांना लिहिलेल्या या पत्रांच्या तीन संचाच्या लिलावाद्वारे किमान ५० ते ६० हजार पौण्ड मिळतील, अशी आशा मलॉक ऑक्शनियर्स यांना वाटत आहे.
महात्मा गांधी यांनी हरिलाल यांना लिहिलेल्या या पत्रांमध्ये हरिलाल यांच्या एकूणच वर्तनाविषयी तीव्र उद्वेग व्यक्त केला आहे. ‘तुझी समस्या आपल्या स्वातंत्र्य लढय़ापेक्षाही मला गंभीर वाटते,’ असे गांधीजी म्हणतात. हरिलाल यांच्या गैरवर्तनासंबंधी गांधीजींनी हे मत मांडले आहे. हरिलाल यांची कन्या मनू यांनी गांधीजींना आपल्या पित्याविषयी अत्यंत गंभीर घटना कथित केल्या. हरिलालने आपल्यावर अत्याचार केल्याचे मनू यांनी गांधीजींना सांगितले होते. मनू हिने आपल्याला तुझ्याविषयी अत्यंत धोकादायक गोष्टी सांगितल्या होत्या, असे गांधीजी आपल्या पत्रामध्ये म्हणतात. आपल्या पित्याच्या या आक्षेपार्ह वर्तनामुळे मनू एवढी ढासळली की, त्यामधून बाहेर येण्यासाठी तिला वैद्यकीय उपचारांची मदत घ्यावी लागली आणि नंतर ती साबरमती येथे आपल्या आजोबांच्या आश्रमात वास्तव्यास आली, असेही गांधीजींनी म्हटले आहे.
‘मलॉक ऑक्शनियर्स’ यांनी यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. गांधीजींच्या कुटुंबातून मिळालेली ही पत्रे गुजराती भाषेतून लिहिली असून त्यांची अवस्थाही चांगली आहे. याआधी ही पत्रे कोणीही वाचलेली नसून गांधीजी आणि हरिलाल यांच्यातील तणावपूर्ण संबंधांवरही या पत्रांद्वारे प्रकाश पडू शकेल, असे ‘मलॉक ऑक्शनियर्स’ ने म्हटले आहे.
हरिलाल हे आपल्या वडिलांप्रमाणे बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जाऊन शिक्षण घेऊ इच्छित होते. परंतु ब्रिटिशांविरोधातील लढा लढण्यास या शिक्षणाचा काही उपयोग होणार नाही, असे वाटून गांधी कुटुंबीयांनी हरिलालना विरोध केला आणि नेमकी हीच बाब १९११ नंतर हरिलाल आणि उर्वरित गांधी कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. त्यानंतर हरिलालचे आपल्या वडिलांशी कधीही संबंध सुधारले नाहीत. आपल्या पुत्राच्या मद्यपानाविषयीही गांधीजी प्रचंड नाराज असल्याचे पत्रांवरून जाणवते. मद्यपान आणि बाहेरख्यालीपणा तुला तेवढाच प्रिय आहे काय, असा संतप्त प्रश्न विचारून दारू  पिण्यापेक्षा तू मरण पावलेला परवडेल, अशी टोकाची भूमिका गांधीजी पत्रातून मांडतात.