राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्यापूर्वीच भारतात विमानाचा शोध लागला होता, हे इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी म्हटले आहे. एका पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना सत्यपाल सिंह यांनी हे विधान केले. परदेशात विमानाचा शोध लागण्याच्या ८ वर्षे आधीच भारतात विमानाची निर्मिती करण्यात आली होती, हे विद्यार्थ्यांना सांगण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

‘राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्याआधीच भारताच्या शिवकर बापूजी तळपदे यांनी विमानाचा शोध लावला होता, हे विद्यार्थ्यांना का शिकवले जात नाही? आपल्या विद्यार्थ्यांना आयआयटीचे शिक्षण घेताना ही गोष्ट सांगायला हवी की नको? त्यांना नक्कीच याबद्दल सांगायला हवे,’ असे सत्यपाल सिंह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले. ‘विद्यार्थ्यांनी शिवकर बापूजी तळपदे यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायला हवी. विद्यार्थ्यांना पुष्पक विमानाची माहिती द्यायला हवी. पुष्पक विमानाचा उल्लेख रामायणामध्ये आलेला आहे. त्याबद्दल विद्यार्थ्यांना सांगायला हवे,’ असेही ते म्हणाले.

प्राचीन भारतीय विज्ञान आणि वैज्ञानिक यांच्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देण्याची गरज असल्याचे सत्यपाल सिंह यांनी म्हटले. ‘भारत सध्या संधोधनात पिछाडीवर पडला आहे. त्यामुळेच संशोधन क्षेत्रातील लोकांनी भारतीय संस्कृतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे,’ असेही सिंग म्हणाले. ‘दरवर्षी भारतात चाळीस हजार लोक पीएचडी करतात. मात्र त्यांच्या संशोधनाच्या गुणवत्तेचा दर्जा फारसा चांगला नसतो,’ अशा शब्दांमध्ये सत्यपाल सिंह यांनी पीएचडी आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या संशोधनावर सवाल उपस्थित केला. पीएचडीसाठीचे रिसर्च पेपर खरेदी केले जात असावेत, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.