केंद्र सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या मंत्र्यांनी राजकीय दौऱ्यांदरम्यान पंचतारांकित हॉटेल्समध्ये जाणं तिथे मुक्काम करणं टाळावं, त्याऐवजी दौऱ्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी निवासस्थानात मुक्काम करावा, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. एवढेच नाही तर तुमच्या खात्याशी संबंधित कोणत्याही सुविधा घेऊ नका अशी तंबीही नरेंद्र मोदींनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर सगळ्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थांबायला सांगितले आणि त्यानंतर त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये न उतरण्याचे आदेश दिले. सार्वजनिक दौऱ्यांच्या वेळी जे मंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करतात त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचीही माहिती समोर येते आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्री हे त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या खात्यांशी संबधित कारचा वापर खासगी आणि कौटुंबिक वापरासाठीही करतात, या कार तुमच्या खासगी वापरासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी नाहीत हे लक्षात ठेवा यापुढे असे एकाही मंत्र्याकडून घडले तर खपवून घेतले जाणार नाही असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

‘घोटाळा न करणारे सरकार’ ही आपल्या सरकारची प्रतिमा आहे, या प्रतिमेला धक्का लागणार नाही याची काळजी प्रत्येक मंत्र्याने घेतली पाहिजे. २०१९ च्या निवडणुकांसाठी आणखी दोन वर्षे बाकी आहेत या काळात आपल्याला ही प्रतिमा जपायची आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

‘भ्रष्टाचाराला थारा नाही’ हे माझे धोरण आहे आणि त्याबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवा असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे.