मलेशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष दिसावेत यासाठी रोबोटिक पाणबुडीच्या साहाय्याने शनिवारी हिंदी महासागरात व्यापक शोध मोहीम राबविण्यात आली, तर बेपत्ता विमानाची शोध मोहीम निर्णायक टप्प्यात आल्याचे मलेशियाने म्हटले आहे.
बेपत्ता विमनाचा शोध घेण्यासाठी शोधकार्यासाठी शोध मोहीम अतिसंभाव्य ठिकाणी करण्यात येत आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी निर्णायक टप्प्यातील शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मलेशियाचे वाहतूकमंत्री हिसामुद्दीने हुसैन यांनी सांगितले.
सर्व प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष पुढील काही दिवसांत सापडावेत, यासाठी जगभरातील प्रत्येकाने प्रार्थना करावी, असे आवाहनही हुसैन यांनी केले.
अपघातापूर्वी नोंदल्या गेलेल्या माहितीचा आधार घेत ब्लूफिन-२१ द्वारे समुद्रातील १० किमीच्या परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली.
बेपत्ता विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या बॅटऱ्या महिन्याभराच्या कालावधीनंतर निष्क्रिय झाल्यानंतरही शोधकार्य सुरू ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या शोध पथकाने बेपत्ता विमानाचा शोध घेतला. काही संकेत प्राप्त केले होते. त्यानुसार विमानाचा थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ब्लूफिन-२१ च्या मदतीने बेपत्ता विमानाच्या शोधासाठी आतापर्यंत १३३ चौरस किमी परिसर पिंजून काढला आहे. आतापर्यंत सहा वेळा ब्लूफिन-२१ द्वारे शोध मोहीम राबविण्यात आली असून, सहाव्या मोहिमेंतर्गत प्राप्त माहितीची तपासणी सुरू असल्याचे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
८ मार्च रोजी झालेल्या या दुर्घटनेच्या ४३ व्या दिवसांनंतरही शोधकार्य सुरू असून, जगभरातील ११ लष्करी विमाने आणि १२ जहाजे शोधकार्यात गुंतली आहेत.
बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी एका विशिष्ट भागात लक्ष केंद्रित करण्यात आले असून ब्लूफिन-२१ द्वारे सुरू असलेले शोधकार्य पुढील आठवडाभरात संपेल, असेही ते म्हणाले.
-हिसामुद्दीन हुसैन
मलेशियाचे वाहतूकमंत्री