संघ परिवाराची घरवापसी मोहीम, भाजपमधीलच सहकाऱ्यांनी धर्माच्या मुद्दय़ावरून केलेली वादग्रस्त विधाने, मदर तेरेसांसदर्भात सरसंघचालकांनी नुकतेच केलेले विधान.. या सर्व पाश्र्वभूमीवर प्रदीर्घ काळापासून मौनव्रत धारण केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेत प्रथमच मौन सोडले. आपले सरकार सर्व धर्माच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून धार्मिक  राजकारणावर त्यांनी जोरदार हल्ला केला. धर्माच्या आधारावर कुणालाही भेदभाव करता येणार नाही. सरकारचा धर्म- ‘देश सर्वप्रथम’ तर ‘राज्यघटना’ हाच सर्वात मोठा धर्मग्रंथ आहे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. त्याचबरोबर जमीन अधिग्रहण विधेयकातील त्रुटी दूर करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्याच योजना नावे बदलून राबवत असल्याच्या आरोपावरून अत्यंत खोचक शैलीत काँग्रेसला चिमटे काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे सव्वा तास लोकसभेत तुफान फटकेबाजी केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेस उत्तर देताना मोदी यांनी सभागृहात काँग्रेसला अक्षरश: सळो की पळो करून सोडले. ‘मनरेगा योजना’ काँग्रेस सरकारच्या अकार्यक्षमतेचा उत्तम नमुना असल्याने ही योजना अत्यंत वाजतगाजत सुरू ठेवणार असल्याची खोचक टीका मोदी यांनी करताच सभागृहात बसलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सर्वच काँग्रेस नेत्यांचे चेहरे खर्रकन उतरले.
तुमच्या जमीन अधिग्रहण विधेयकातील काही त्रुटी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर करण्यास सहकार्य करा; मी सार्वजनिकरीत्या या विधेयकाचे श्रेय तुम्हाला (काँग्रेस) देईन, या मोदींच्या विधानावर सत्ताधारी खासदारांनी बाके वाजवून सभागृह दणाणून सोडले. जमीन अधिग्रहण कायद्याचा सर्वाधिक लाभ ओडिशा, पश्चिम बंगाल, पूर्व-उत्तर प्रदेश व ईशान्य भारताला होईल. देशाच्या विकासासाठी राज्यांचा विकास करू, असे आश्वासनही मोदी यांनी दिले. धर्मातरण, लव्ह जिहाद आदी मुद्दय़ांवरून विरोधकांनी भाजपला नेहमीच धारेवर धरले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले की, धर्माच्या आधारावर कुणालाही भेदभाव करता येणार नाही. सरकारचा धर्म- ‘देश सर्वप्रथम’ तर ‘राज्यघटना’ हाच सर्वात मोठा धर्मग्रंथ आहे. मोदींच्या घणाघाती भाषणाचा समारोप मात्र त्यांच्या जुन्याच ‘आयडिया ऑफ इंडिया’च्या शैलीदार वाक्यांनी झाला.
पंतप्रधानांना संसदेत येण्यासाठी व्हिसा देऊ, या विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर देताना मोदी आक्रमक झाले. प्रत्येक पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जात असतो. त्यावरून माझ्यावर टीका करण्याऐवजी मी तिथे काय करतो, याचा मला जाब विचारा, असे म्हणून मोदी यांनी विरोधकांना धारेवर धरले.
मोदींच्या भाषणात स्वच्छ भारत अभियान, जन-धन योजना, कोळसा खाण वितरण, ईशान्य भारतासाठी आखलेल्या विकास योजनांचा उल्लेख होता. ते म्हणाले की, जेव्हा राजकारणी स्वच्छतेवर बोलतात तेव्हा सारा देश त्याविषयी बोलू लागतो. त्यामुळे ‘स्वच्छ भारत’ योजना हाती घेतली. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या आसाम, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने केलेल्या विजयी कामगिरीकडे मोदींनी सभागृहाचे लक्ष वेधले. मोदी म्हणाले की, काळ्या पैशाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली. त्यामुळे देशातील प्रत्येक जण या मुद्दय़ावर बोलू लागला. हे सरकारचे यश आहे. राज्य-केंद्र संबंधाला नवा आयाम दिल्याचा दावा मोदी यांनी केला.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अभिवादन दिवस
पीडीपीसमवेत जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच सत्तेचा सोपान चढणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने येत्या १ मार्च रोजी ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अभिवादन दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. १ मार्च रोजी पीडीपी-भाजप सरकारचा शपथविधी होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेला मालार्पण तसेच फटाके फोडून, मिठाई वाटून हा ऐतिहासिक दिवस साजरा केला जाणार आहे.