संसदेत सेंट्रल हॉलमध्ये बांधण्यात आलेल्या ग्रंथालयात गुरुवारी एका माकडाने प्रवेश केला. हे ग्रंथालय खासदार आणि पत्रकारांसाठी बांधण्यात आले आहे. अर्धा तास हे माकड येथे फिरत राहिले. या दरम्यान त्याने टेबलावरून इकडून तिकडे उड्या मारल्या आणि गॅलरीमधील विजेच्या वायरींवरून चढ-उतार केले. ३० मिनिटांपर्यंत त्याला बाहेर पडायचा मार्ग न सापडल्याने ते मुख्य दरवाज्याने बाहेर आले. तेथून हिरव्या कारपेटवरून चालत कॉरिडोअरमधून जात व्हीआयपी गेटमधून बाहेर पडले. नंतर सेंट्रल हॉलमधील उपस्थित सुरक्षारक्षकांनी दरवाजा बंद करून घेतला. माकडाने सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केला नाही हे नशीब. येथे मंत्री, पत्रकार आणि कँटिंनच्या कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. या माकडाला बाहेर हुसकावून लावण्यासाठी ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी सुरक्षारक्षकांना आवाज दिला. परंतु, मदतीसाठी कोणीही आले नाही.