भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला येथे सुरुवात झाली. उद्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली तसेच आर्थिक विकासाची गती मंदावल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. त्याला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान या बैठकीत सरकारने गरिबांसाठी कोणते कार्यक्रम आखले याची तपशीलवार मांडणी करतील अशी अपेक्षा आहे.

सोमवारच्या कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जनसंघाचे प्रमुख नेते, तत्त्वचिंतक दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या समारोपनिमित्त या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. देशाची अर्थव्यवस्था संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात होती, त्यापेक्षा भाजप सरकारच्या काळात अधिक भक्कम असल्याचा ठराव आणला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी हे सरकारचे मोठे यश असल्याचे श्रेय घेतले जाईल. रोहिंग्यांचा मुद्दाही ठरावात असेल, असे भाजपच्या एका नेत्याने स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधींची उपस्थिती

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे वैशिष्टय़ म्हणजे पक्षाचे चौदाशे आमदार, ३३७ खासदार याखेरीज राज्यांमधील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. दोन हजारांवर प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.