पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतील आधीच्या सरकारने व्हिसा नाकारला होता. बराक ओबामांचे सरकार मोदींचे अमेरिकेत स्वागतच करेल असे उदगार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काढले.
सन २००२ साली घडलेल्या गुजरात दंगलीप्रकरणी अमेरिकेने २००५ साली नरेंद्र मोदींचा व्हिसा नाकारला होता. त्यानंतर मोदींचा आता पहिलाच अमेरिका दौरा होणार आहे. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींना अमेरिकेचा व्हिसा नाकारणे ही अमेरिकेची चूक होती असे वाटते का असा प्रश्न केरी यांना विचारला असता ते म्हणाले की, “त्यावेळी अमेरिकेत वेगळे सरकार होते आणि आता वेगळे आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत होणाऱया मोदींच्या भेटीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नरेंद्र मोदींचे अमेरिकेत स्वागत असून त्यांना व्हिसा मिळेलच. त्यामुळे मागील गोष्टी उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही मागील गोष्टींवर विचार करण्यास आलेलो नाही आम्ही पुढे पाहत आहोत.” असेही ते म्हणाले.