शंभर दिवसांत आम्ही काळा पैसा मायदेशात परत आणू, असे आश्वासन एकदाही प्रचारादरम्यान दिले नसल्याचे स्पष्टीकरण देण्याची वेळ केंद्रीय शहरी विकासमंत्री वैंकय्या नायडू यांच्यावर आली. नायडू यांच्या विधानावर लोकसभेत गदारोळ झाला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये काळा पैशाच्या मुद्दय़ावरून तत्कालीन सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने लोकसभेत थेट कोलांटउडी मारली आहे. त्यामुळे निवडणुकीतील आश्वासने केवळ पोकळ बाता असल्याची प्रचीती सभागृहात आली. काळा पैसा परत आणण्यासाठी निवडणूक जाहीरनाम्यात कृती दल स्थापण्याचे आश्वासन भाजपने दिले होते; शंभर दिवसांत पैसा परत आणण्याचे नाही, अशा शब्दात केंद्रीय  संसदीय कामकाजमंत्री वैंकय्या नायडू यांनी विरोधकांना उत्तर दिले. वरचढ म्हणजे, शंभर दिवसांत काळा पैसा मायदेशी आणण्याचे आश्वासन देण्याइतके आम्ही अपरिपक्व नाहीत, असे म्हणत त्यांनी यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करणार नसल्याचे संकेत दिले.
परदेशस्थित बँकांमध्ये खाती असलेल्या भारतीयांचे नाव जाहीर करण्याची मागणी करणारे आज काळा पैसा दडवलेल्यांना मदत करीत आहेत. त्यामुळे खबरदारी घ्यावी लागेल. काळा पैसा मायदेशी आणण्यासाठी वेळप्रसंगी मनी लाँड्रिंग अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करू, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केली. काळ्या पैशाच्या मुद्दय़ावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते.
 परदेशी बँकांमधील काळा पैसा मायदेशी परत आणण्यावरून लोकसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये घमासान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनाची आठवण करून देत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव म्हणाले की, भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले.  परंतु शंभर दिवस झाल्यानंतरही काळ्या पैशाच्या मुद्दय़ावर सरकारने एकदाही ठोस निर्णय घेतलेला नाही. काळा पैसा भारतात आणण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी यादव यांनी केली. त्यावर नायडू यांनी सरकारने काळ्या पैशांच्या मुद्दय़ावर घेतलेल्या विविध निर्णयांची यादीच वाचून दाखवली.
काळा पैसा परत आल्यास देशातील प्रत्येक तरुणाला पंधरा लाख रुपये मिळण्याचे खोटे आश्वासन भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान दिल्याचा टोला यादव यांनी लगावला. विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेतल्याने नायडू यांनी नाराजी व्यक्त केली.
संपुआ सरकारच्या काळात काळ्या पैशाच्या मुद्दय़ावर एकही निर्णय झाला नाही, त्यांनी कुणाही खातेदाराचे नाव घोषित केले नाही. त्या वेळी तुम्ही शांत होतात, असे प्रत्युत्तर नायडू यांनी यादव यांना दिले. टीका करण्याऐवजी काळा पैसा परत मायदेशी आणण्यासाठी चांगल्या कल्पना सुचवा, असे आवाहन नायडू यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर म्हणाले की, निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून सरकारने देशवासीयांची क्षमा मागावी अशी मागणी त्यांनी
केली.