जम्मू-काश्मीर, नियंत्रण रेषा तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर गेले काही दिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन करून त्या भागांत पाकिस्तानकडून सुरू असलेल्या बेछूट गोळीबार व तोफगोळ्यांच्या भडिमाराच्या पाश्र्वभूमीवर उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची ध्वजबैठक आयोजित करण्याचा विचार भारताने ऐन वेळी रद्द केला असून पाकिस्तानच्या येत्या काही दिवसांतील वर्तनानुसार अशी बैठक घ्यावी की नाही, याचा विचार केला जाईल, असे जाहीर केले आहे. संरक्षण दलाच्या तिन्ही प्रमुखांनी मंगळवारी संरक्षणमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीबाबत चर्चा केली.
भारताच्या ४० चौक्यांवर गोळीबार झाल्यानंतर तणाव कमी करण्याच्या दृष्टीने कमाण्डर पातळीवर ध्वजबैठक घेण्यासंबंधी सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी. के. पाठक यांना मंगळवारी निरोप पाठविण्यात आला होता. नंतर मात्र तो विचार रद्द करण्यात आला.
सत्तांतरामुळे भारतातील वातावरण आता बदलले आहे, असे शाब्दिक इशारे भारत देत असतानाही पाकिस्तानकडून बेफाम गोळीबार सुरूच आहे.    

२००० घुसखोर सज्ज?
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे सुमारे २००० अतिरेकी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत सज्ज आहेत, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली. सुमारे २० प्रशिक्षण शिबिरांमधून २०००हून अधिक अतिरेकी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची खबर आहे. पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय सैन्यावर गोळीबार होत असतानाच या अतिरेक्यांना घुसवण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे.