वाढत्या दहशतवादामुळे राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारा संचलन सोहळा सुरक्षा यंत्रणांसाठी आव्हानच असतो. त्यात यंदा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भारतासह अमेरिकी सुरक्षा यंत्रणांची खास पथके राजधानीत आतापासूनच तळ ठोकून बसली बसली असून दिल्लीला एखाद्या अभेद्य किल्ल्याचे स्वरूप येत आहे. ओबामा २५ जानेवारीला तीन दिवसांच्या भारतभेटीवर येत आहेत. दिल्लीशिवाय ते आग्रा येथेही भेट देतील.
विशेष बाब म्हणजे यंदा प्रथमच विमानतळ, रेल्वे व बस स्थानके आणि अन्य मोक्याच्या ठिकाणी ८० ते १०० फेस रेकग्निशन कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांना यापूर्वी उपलब्ध असलेली संशयितांची छायाचित्रे पुरवलेली असतील. गर्दीवर नजर ठेवताना त्यांपैकी कोणताही चेहरा त्यांना आढळल्यास त्वरित ओळखला जाईल आणि त्या व्यक्तीला सहज पकडता येईल.
दिल्ली पोलिसांचे ८०,००० कर्मचारी, निमलष्करी दलांचे २०,००० जवान, हरयाणा, राजस्थानसारख्या शेजारी राज्यांमधून मागवलेले अधिकचे सुरक्षा कर्मचारी, इंडिया रिझव्र्ह बटालियन्सचे जवान राजधानीत तैनात केले जाणार आहेत.  
भारताच्या सुरक्षा दलांसह अमेरिकेतून राष्ट्राध्यक्षांची खास सुरक्षा पथके भारतात दाखल झाली आहेत. त्यांनी दिल्लीतील कार्यक्रमस्थळासह आग्य्रापर्यंतच्या मार्गाची यापूर्वीच टेहळणी केली आहे. अमेरिकेची सुरक्षा दले कार्यक्रमाच्या ७२ तास अगोदर राजपथ परिसरातील दिल्ली मेट्रो रेल्वे स्थानके आणि महत्त्वाच्या इमारतींचा ताबा घेतील. मोक्याच्या ठिकाणी बंदूकधारी नेमबाज तैनात केले जातील. अमेरिकी सुरक्षा दलांनी ओबामा उतरणार असलेल्या हॉटेलसह अन्य ठिकाणांची टेहळणी सुरू केली आहे. राजपथला छेदणारे रस्ते आणि एक किलोमीटर परिघातील रेल्वे स्थानके बंद करण्यात येतील. कार्यक्रमस्थळी मान्यवर बसण्याच्या जागेला वर्तुळाकार सात कडय़ांची सुरक्षा प्रदान केली जाईल.