रशिया समर्थक बंडखोरांविरुद्ध युक्रेन शासनाने हाती घेतलेल्या कारवाईला एक दिवसाची स्थगिती देण्यात आली आह़े  पूर्व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या या कारवाईमुळे मलेशियन विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पथकाच्या कार्यात अडथळे येत होत़े
मलेशियन एअरलाइन्सचे एमएच१७ हे प्रवासी विमान बंडखोरांनी काही दिवसांपूर्वी पाडले होत़े  त्याची चौकशी करण्यासाठी डच आणि ऑस्ट्रेलियन पोलिसांचे एक  पथक युक्रेनमध्ये आले आहे; परंतु बंडखोर आणि शासनामध्ये सुरू असलेल्या चकमकींमुळे गेले पाच दिवस प्रयत्न करूनही त्यांना विमान कोसळलेल्या ठिकाणी पोहोचता आलेले नाही़  विमानातील प्रवाशांचे मृतदेहही दोन आठवडय़ांपासून तेथेच पडून असल्यामुळे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी युक्रेन शासनाला या भागातील कारवाई थांबविण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार एक दिवस या भागातील कारवाई थांबविणार असल्याचे युक्रेनचे लष्करी प्रवक्ते ओलेक्सिय मित्राश्किव्हस्की यांनी वृत्तसंस्थेला सांगितल़े