चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे पाकिस्तानच्या पहिल्याच भेटीवर आगमन झाले असून ते या देशाबरोबर ४६ अब्ज डॉलरचे करार करण्यात आले, त्यात धोरणात्मक संबंधातील करारांचा समावेश आहे. दरम्यान दोन्ही देशांनी चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेसह ५० करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी   जिनपिंग यांनी चर्चा केली.
अध्यक्ष क्षी जिनपिंग व त्यांच्या पत्नी पेंग लियुआन यांचे रावळिपडी येथे नूरखान विमानतळावर उतरल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन, पंतप्रधान नवाझ शरीफ, लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ व मंत्रिमंडळाचे सदस्य या वेळी उपस्थित होते. जीनपिंग यांच्या विमानाला जेएफ १७ थंडर जेट्सचे संरक्षण देण्यात आले होते. ही जेटविमाने पाकिस्तानने चीनच्या मदतीनेच तयार केलेली आहेत.
पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी जिनपिंग यांना पाकिस्तानचा ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा सर्वोच्च नागरी सन्मान दुपारी प्रदान केला.
राजधानीत कडक सुरक्षा ठेवण्यात आली असून सर्व प्रमुख रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली होती. विमानतळावर जिनपिंग यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. पाकिस्तान-चीन मैत्री झिंदाबादचे फलक या वेळी दाखवण्यात आले, दोन्ही देशांचे ध्वज कार्यक्रमांच्या ठिकाणी होते. चर्चेनंतर दोन्ही देशात चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका करार झाला असून त्यामुळे पाकिस्तानच्या ग्वादर बंदराचा विकास होणार आहे. पाकव्याप्त काश्मीरमार्गे त्यामुळे व्यापार सुरू होईल.  पाकिस्तानचे विकासमंत्री अहसान इक्बाल यांनी सांगितले, की या मार्गिकेसाठी ४६ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च येणार आहे. तीन वर्षांत १०,४०० मेगावॉट वीजनिर्मितीही करण्याच्या प्रकल्पांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.