पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावर तसेच लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी  शुक्रवारी रात्री फैसलाबादच्या तुरुंगामध्ये फासावर चढविण्यात आले.
  ज्या १७ अतिरेक्यांना फासावर चढविण्यात येणार आहे, त्यांच्यामध्येच या दोघा अतिरेक्यांचा समावेश होता. अकील उर्फ डॉ. उस्मान व अर्शद मेहमूद या दोघांना फाशी देण्यात आली. उस्मान हा रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयावर २००९ मध्ये झालेल्या हल्ल्याशी संबंधित असल्याचा आरोप होता. तर अर्शद मेहमूद उर्फ मेहरबान याने परवेझ मुशर्फ यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. एकूण १७ दहशतवाद्यांना येत्या दोन दिवसांत फाशी देण्यात येणार आहे. कराची, फैसलाबाद, लाहोर, सक्कर येथे तुरुंग अधिकाऱ्यांना  दहशतवाद्यांना फाशी देण्याची तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माजी पंतप्रधान शौकत अजिज यांच्यावर हल्ला करणारा नूर बादशाह, हैदराबाद तुरुंगात असलेला व अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्ल याला ठार करणारा शेख ओमर सईद व फजल हमीद याला फाशी दिले जाणार आहे. पाकिस्तानात २००८ मध्ये शेवटची फाशी देण्यात आली होती, त्यानंतर फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली होती.