पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर सध्या पाकिस्तानी माध्यमांमधून मोठी टीका होते आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका संमेलनात शरीफ यांची चांगलीच फजिती झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांसोबत पाकिस्तानी माध्यमांमध्ये नवाज शरीफ सध्या चेष्टेचा विषय झाले आहेत. इस्लामिक संमेलनात सहभागी झालेल्या शरीफ यांना बोलण्याची संधीच न मिळाल्याचे वृत्त पाकिस्तानच्या द नेशन या वृत्तपत्राने दिले आहे. त्यामुळे शरीफ यांची सध्या पाकिस्तानात थट्टा केली जाते आहे.

सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये इस्लामिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. मात्र या संमेलनावेळी नवाज शरीफ यांना मंचावर आमंत्रित करण्यात आले नाही. विशेष म्हणजे शरीफ यांनी या संमेलनासाठी संपूर्ण भाषण तयार केले होते. या भाषणाची तयारीदेखील शरीफ यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान केली होती. मात्र शरीफ यांना या संमेलनात बोलण्याची संधीच मिळाली नाही. पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतच पाकिस्तानी लष्कराचे माजी प्रमुख राहील शरीफ यांनादेखील या संमेलनात बोलण्याची संधी मिळाली नाही.

पाकिस्तानची फजिती यावरच थांबली नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात भारत, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांवरील दहशतवादाच्या घातक परिणामांचा उल्लेख केला. मात्र ट्रम्प यांनी या दरम्यान पाकिस्तानचा उल्लेखदेखील केला नाही. ‘मुस्लिम देशांनी त्यांच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाणार नाही, याची जबाबदारी घ्यावी,’ असे ट्रम्प यांनी या संमेलनात बोलताना म्हटले. ‘ट्रम्प यांच्या विधानामुळे दु:ख झाले आहे. दहशतवादविरोधी लढाईतील पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख ट्रम्प यांनी केला नाही,’ असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.