भारताने मंगळवारी पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला आणि पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर जी आर्थिक मदत केली जाते त्याचा वापर दहशतवाद्यांना प्रशिक्षण, आर्थिक साहाय्य आणि दहशतवादी गटांना पाठिंबा देण्यासाठी करण्यात येतो, असा हल्लाही भारताने चढविला.

पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा खराखुरा केंद्रबिंदू आहे, पाकिस्तानमध्ये दहशतवादाची पाळेमुळे इतकी खोलवर रुजलेली आहेत की ते बलुचिस्तान, सिंध आणि खैबर आणि आदिवासी क्षेत्रात स्वदेशवासींयाविरुद्धही त्याचा वापर करण्यास कचरत नाहीत, असेही भारताने म्हटले आहे.

मानवी हक्क परिषदेच्या ३३व्या सत्रात पाकिस्तानने केलेल्या निवेदनाला उत्तर देताना भारताने म्हटले आहे की, उरीमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानात दहशतवाद अद्यापही सक्रिय असल्याचे स्पष्ट होते.

दहशतवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेल्या स्फोटक साहित्य, नकाशे, घुसखोरीची पद्धत, साहित्यावर असलेले पाकिस्तानचे शिक्के हा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा सहभाग असल्याचा ठोस पुरावा आहे, असेही भारताने स्पष्ट केले आहे.