पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीवरील पुलाचे उद्या उद्घाटन करणार आहेत. या पुलामुळे ब्रम्हपुत्रा नदीच्या दक्षिण तटावरील धोला आणि उत्तर तटावरील सादिया हे दोन भाग जोडले जाणार आहेत. ९ किलोमीटरहून अधिक लांबीचा असलेला ब्रम्हपुत्रेवरील पूल देशातील सर्वाधिक लांबीचा पूल असणार आहे. या पुलामुळे अरुणाचल प्रदेशमधील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

ब्रम्हपुत्रा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाचा सर्वाधिक फायदा भारतीय लष्कराला होणार आहे. या पुलामुळे लष्कराला भारत-चीन सीमेवर पोहोचण्यासाठी तीन ते चार तास लागणार आहेत. या सीमेवर भारताच्या किबिथू, वालॉन्ग आणि चागलगाम या चौक्या आहेत. ब्रम्हपुत्रा नदीवरील पुलाच्या उभारणीसाठी १० हजार कोटींचा खर्च आला आहे. पुलाच्या निर्मितीला विलंब झाल्याने या पुलाच्या उभारणीच्या खर्चात वाढ झाली. पुलाला जोडण्यासाठी २८.५ किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

ब्रम्हपुत्रा नदीवरील धोला-सादिया पूल सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. चीनकडून सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची निर्मिती केली जाते आहे. ब्रम्हपुत्रा नदीवरील पूल हे भारताचे चीनला प्रत्युत्तर मानले जाते आहे. चीनच्या हालचाली लक्षात घेता भारताने लष्कराच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती सुरु केली.

मुंबईतील वांद्रे-वरळी सी – लिंक ५.६ किलोमीटर लांबीचा आहे. मात्र ब्रम्हपुत्रा नदीवरील पुलाची लांबी सी – लिंकपेक्षा जास्त आहे. ब्रम्हपुत्रा नदीवरील पुलाच्या बांधकामाला २०११ मध्ये सुरु झाली. या पुलामुळे इंधनाची आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. २००३ मध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री मुकुट मिथी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे पुलाच्या निर्मितीची मागणी केली होती. ‘पुलाची उभारणी केल्यास चीन सीमेपर्यंत पोहोचणे सोपे होईल,’ असे मिथी यांनी वाजपेयी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.